शिक्षकांनी कृती, ज्ञान, व्यक्तिमत्त्वातून आदर्श निर्माण करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:14+5:302021-08-17T04:45:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शिक्षकांनी आपल्या कृतीतून, ज्ञानातून, आचार-विचार, व्यक्तिमत्त्वातून आदर्श निर्माण केले पाहिजेत, ही काळाची गरज आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शिक्षकांनी आपल्या कृतीतून, ज्ञानातून, आचार-विचार, व्यक्तिमत्त्वातून आदर्श निर्माण केले पाहिजेत, ही काळाची गरज आहे, असे मत प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ. विनय वेलणकर यांनी व्यक्त केले. ‘खेळांचे मानसशास्त्र’ या विषयावर त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिरतर्फे शनिवारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी राणाप्रताप भवन येथील डॉ. हेडगेवार सभागृह येथे आहार, क्रीडा व व्यायाम या विषयांवर विविध व्याख्याने झाली.
खेळामुळे मिळणारे फायदे, खेळाडूंचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठणे, अभ्यंग स्नान, व्यायामातील सातत्य ही आयुर्वेदातील त्रिसूत्री सांगितली. घरचेच पारंपरिक पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत, ज्यामुळे शक्ती व बुद्धिमत्ता वाढेल व खेळाची आवड वाढेल, असे ते पुढे म्हणाले. खेळ व शरीराची संरचना, मानवी हालचालींचा शास्त्रोक्त अभ्यास, नित्याच्या कामातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण, कौशल्ये कशी ओळखायची हे सांगितले. तर दंड, बैठका, सूर्यनमस्कार, व्यायाम हा सर्वांसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. घन:श्याम धोकरट यांनी केले.
प्रास्ताविकात संस्थेचे पदाधिकारी संजय कुलकर्णी यांनी क्रीडाक्षेत्रातील विविध खेळाडूंची होणारी उपेक्षा, याबद्दल खेद व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नयना पाटील यांनी उपक्रमाचा व्यक्तिगत अभिप्राय मांडला.
दुसऱ्या सत्रात मुख्याध्यापक अंकुर आहेर यांनी ‘खेळाडू घडविताना’ या विषयावर व्याख्यान दिले. यात प्राथमिक शिक्षकांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. क्रीडेतून आनंद, शारीरिक स्वास्थ्य, खेळाडूंच्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या क्षमतांचे बारकाईने निरीक्षण करून त्यानुसार विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. यात मोटिव्हेशनही तितकेच महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.
प्रसिद्धीप्रमुख मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांनी आभार मानले, तर क्रीडाशिक्षक रवींद्र पवार, विकास हिवाळे आदींनी नियोजनाचे काम पाहिले. या व्याख्यानासाठी संस्थेच्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक स्तर, निवडक क्रीडाशिक्षक शिक्षक उपस्थित होते.
‘व्यायाम टाळू नका’
तिसऱ्या सत्रात कुलकर्णी यांनी ‘व्यायाम समज-गैरसमज’ या विषयावर व्याख्यान दिले. व्यायाम म्हणजे तुमच्यातील ऊर्जा खर्च करणे होय. ताकद, लवचीकता, दम, श्वास, चपळता वाढवणे होय. परावलंबित्व येऊ नये म्हणून व्यायाम करावा, म्हणून तो कधी टाळू नये, पुढे ढकलू नये. त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
फोटो आहे
-------------