डहाणू प्रकल्प अधिकाऱ्याचे पाड्यावर अध्यापन; अनलॉक लर्निंग पथदर्शी उपक्रमाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 12:25 AM2020-11-08T00:25:11+5:302020-11-08T00:25:17+5:30
३० हजार विद्यार्थ्यांना लाभ
बोर्डी : डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ऑफलाइन शिक्षणास प्रारंभ केला आहे. त्याचा फायदा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व करताना प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल या कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त पाड्यावर जाऊन अध्यापन करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शासनाने अनलॉक लर्निंग उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे ऑफलाइन शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरिता भौगोलिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे वसतिस्थान लक्षात घेऊन शिक्षकांना कामाचे वाटप केले आहे. त्यानुसार, शिक्षक गावपाड्यांवर जाऊन अध्यापन करीत आहेत. या प्रकल्पांतर्गत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यांत अनुदानित आणि शासकीय अशा एकूण ५५ आश्रमशाळांतील सुमारे ३० हजार आदिवासी विद्यार्थ्यांना अखंडित शिक्षण मिळणार असून अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच ते स्पर्धेत टिकून राहण्यास मदत होणार आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांकडून पहिली ते बारावी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर आधारित विषयनिहाय ऑडिओ-व्हिडिओ साहित्य तयार केले आहे. या उपक्रमाला गती येण्यासाठी डहाणू प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.