पथकप्रमुख बदलले, परिस्थिती जैसे थे
By admin | Published: February 3, 2016 02:10 AM2016-02-03T02:10:46+5:302016-02-03T02:10:46+5:30
पदपथ, महत्वाचे चौक आणि रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ठोस कारवाईची मोहीम सुरू केली
प्रशांत माने, डोंबिवली
पदपथ, महत्वाचे चौक आणि रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ठोस कारवाईची मोहीम सुरू केली असताना अचानक सोमवारपासून ही कारवाईची मोहीम थंड पडली आहे.
पथकप्रमुख बदलले परंतु परिस्थिती जैसे थे राहील्याने फेरीवाल्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन नमले का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रश्नावर वारंवार महासभेतही लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविला जातो. लक्षवेधी मांडून केडीएमसी प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आणला गेला आहे. परंतु, आयुक्तपदी ई रवींद्रन हे विराजमान होताच रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे.
या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम उघडली असून त्याअंतर्गत कल्याण डोंबिवलीत जोमाने कारवाई सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात डोंबिवलीत रामनगर प्रभागाचे स्थानिक नगरसेवक तथा मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांविरोधात भूमिका घेतली होती. यात त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा आणि त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून घडला होता.
प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही याबाबत हळबे यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. यावर प्रशासनाने ग प्रभागाचे फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख संजय साबळे यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी रमाकांत जोशी यांची नेमणूक केली.
परंतु, पथकप्रमुख बदलून देखील परिस्थिती जैसे थे च राहीली असून वास्तव पाहता फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरणारे हळबे आणि नवनियुक्त पथकप्रमुख जोशी गेले कुणीकडे? असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)