उपऱ्यांच्या फौजेमुळे संघ ‘मनसे दक्ष’ नाहीच
By admin | Published: October 27, 2015 01:30 AM2015-10-27T01:30:34+5:302015-10-27T01:30:34+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंतच्या प्रचारात भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसह पंकजा मुंडे
नारायण जाधव, ठाणे
कल्याण-डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंतच्या प्रचारात भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसह पंकजा मुंडे अशा साऱ्यांनाच प्रचारात उतरवले आहे. मात्र, तिकीटवाटपापासून ते आजपर्यंतच्या या प्रवासात भाजपाच्या श्रेष्ठींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कमालीचे ‘संचलन’ करून विजयी पताका फडविण्यात कायम ‘दक्ष’ राहिलेल्या संघ परिवाराला मात्र दूर ठेवले आहे. त्यातच स्थानिक पातळीवरील प्रचाराची सारी धुरा पक्षातील उपऱ्या नेत्यांच्या हाती सोपविल्यामुळे पडत्या काळापासून आजपर्यंतच्या प्रवासात भाजपाला साथ देणाऱ्या परिवारनिष्ठ ‘चक्रधारी जगन्नाथांसह रामनाथांवर माधुकरी’ मागण्याची वेळ आली आहे.
शत-प्रतिशत भाजपा हे उद्दिष्ट ठेवून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला लाथाडून, स्थानिक नेत्यांच्या बालहट्टापायी पक्षाच्या श्रेष्ठींनी युती तोडून प्रचाराची धुरा २७ गावांसाठी लढा देणाऱ्या आमदार नरेंद्र पवारांऐवजी आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविली. हे कमी म्हणून पक्षाचे जुनेजाणते माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिक्षक आमदार रामनाथ मोते, ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर चक्रदेव यांना कायम सापत्न वागणूक देऊन, तिकीटवाटपात उच्चशिक्षित उमेदवारांऐवजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या, तसेच अन्य पक्षांतून आलेल्यांना प्राधान्य दिले. त्यात आणखी भर म्हणून वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादीतून पक्षात आलेल्या खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत पाटील यांना नको तेवढे महत्त्व दिले. शिवाय त्यांच्या बगलबच्च्यांनाही तिकीटवाटपात प्राधान्य दिले. यामुळे या उपऱ्या नेत्यांच्या नेतृत्वावर मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर या साऱ्यांसह सर्व प्रमुख नेत्यांनी नको तेवढा विश्वास ठेवल्याचे दिसत आहे. जगन्नाथ पाटलांचा केवळ आगरी नेतृत्व म्हणून त्या २७ गावांपुरताच वापर केला जात आहे, तर ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर चक्रदेव यांच्यासह शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना आजपर्यंतच्या प्रचारात कुठेच स्थान दिलेले नाही. यामुळे डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या शाखा-शाखांमधून भाजपाच्या या स्वार्थी प्रवृत्तीविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येथील एका व्यायामशाळेत घेतलेल्या कथित गुप्त बैठकीच्या जोरावर कल्याण-डोंबिवलीतील संघ परिवाराला गृहीत धरून, गेल्या खेपेसारखे राज ठाकरेंच्या मनसेसोबत आपले स्वयंसेवक जाणार नाहीत, असा अंदाज बांधला आहे. मात्र, अंतिम टप्प्यात तो फोल ठरल्याचे दिसू लागल्याने, पक्षाच्या आमदारांना आता स्वयंसेवकांची नाराजी दूर करताना नाकीनऊ आले आहेत.