कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पथकांनाच गैरप्रकारांची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 05:40 PM2021-05-25T17:40:14+5:302021-05-25T17:43:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे.

teams assigned to prevent corona infection are not do work proper in miraroad | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पथकांनाच गैरप्रकारांची लागण

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पथकांनाच गैरप्रकारांची लागण

Next

मीरारोड - कोरोना संसर्ग आटोक्यात आण्यासाठी कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात ५७ पथके तैनात करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचा नवा पॅटर्न शहरात आणला. परंतु या बहुतांश पथकांना कामचुकारपणा आणि गैरप्रकाराची लागण झाल्याने नियमांचे पालन होताना दिसत नाही. एका पथकास कारवाई करण्यास सांगून देखील त्यांनी उल्लंघन करणाऱ्यास सावध केल्याने शेवटी स्वतः उपायुक्त अजित मुठे यांनीच जाऊन कारवाई करत २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. 

मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे. संसर्ग झाल्यावर वैद्यकीय उपचार यंत्रणा आणि होणारा मोठा खर्च  पाहता त्या ऐवजी कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी जास्तीजास्त खबरदारी घेण्यासाठी घेता यावी  म्हणून मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी तब्बल ५७ गस्ती पथके शहरात नेमली. प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षा रक्षकासह १ पोलीस कर्मचारी असे ५ जणांचा समावेश आहे. पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समिती निहाय नेमण्यात आलेले आहेत. 

पथकांनी त्यांच्या अखत्यारीतील प्रभागात सतत गस्त घालण्यासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करायची आहे. विना मास्क वा मास्क नीट घातलेला नसेल, गर्दी  केली असेल, बंदी असून देखील दुकाने - आस्थापना खुली असेल, फेरीवाले बसले असतील किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असेल तर अशांवर ठरवून दिलेल्या दंडानुसार कारवाई पथकांनी करायची आहे. पथकांमधील जगदीश भोपतराव, राज घरत आदी काही अधिकारी कारवाई तसेच दंड वसुली केल्याचे पालिककडून कळवले जाते. परंतु काही अपवाद वगळताच ही पथके कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर काटेकोर आणि नियमितपणे कारवाई करत असल्याचे शहरात चित्र आहे. त्यातही प्रत्येक पथकात पोलीस कर्मचाऱ्याचा आयुक्तांनी समावेश केला असला तरी पोलीस कर्मचारी पथका सोबत येत नसल्याचे सुद्धा दिसून आले आहे. 

कोरोना संसर्ग पसरण्यास नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याचे महत्वाचे कारण असल्याने लोकांचा बेशिस्तपणा रोखण्यासाठी नगरसेवक - राजकारण्यांसह पोलीस व पालिका प्रशासनाने मिळून कारवाईचा कठोर बडगा उगारणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी नेमलेली पथकेच कामचुकारपणा आणि गैरप्रकार करू लागल्याने शहरात राजरोस नियमांचे उल्लंघन सुरू आहे. भाईंदर पूर्वेस रेल्वे स्थानक समोर असलेले सुरभी स्नॅक्स कॉर्नर हे नियमांचे उल्लंघन करून सुरु असल्याचे आणि दुकाना बाहेर गर्दी होत असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी रविवारी तेथील प्रभाग अधिकारी व पथकास छायाचित्रासह दिली. परंतु पथक गेले आणि सुरभी केंद्र बंद असल्याचे फोटो उपायुक्तांना पाठवून उपायुक्तांची माहिती खोटी ठरवल . 

रात्री उशिरापर्यंत सुरभी नाश्ता केंद्र सुरू असल्याचे मुठे यांना समजले. सोमवारी स्वतः मुठे यांनीच थेट सुरभी नाश्ता केंद्रावर धाड टाकली आणि बंदी असून सुद्धा ते दुकान सुरु असल्याचे सिद्ध केले. मुठे यांनी पालिका पथकास बोलावून घेऊन चालकाकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करायला लावला. या प्रकरणी प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये आणि पथकाची हजेरी घेत खुलासा सादर करण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदीपासून अगदी महापालिका कार्यालयात सुद्धा वावरतात. भाज्या - मासळी आदी खरेदीसाठी प्रचंड गर्दी करणे, खाण्या - पिण्याच्या ठिकाणी सुद्धा गर्दी असते.  त्यामुळे नियमांचे पालन न करता संसर्ग पसरवणाऱ्या लोकांवर कारवाईचा कठोर बडगा उगारण्याची मागणी होत आहे.

Web Title: teams assigned to prevent corona infection are not do work proper in miraroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.