सीईटीपी केंद्राला करणार तांत्रिक मदत, इस्त्राईलच्या कंपनीकडून पाहणी, आधुनिकीकरणाच्या दिशेने पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:11 AM2018-12-26T03:11:21+5:302018-12-26T03:11:39+5:30
डोंबिवली शहरातील एमआयडीसीतील फेज २ मधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीईटीपी) इस्त्राईलच्या कंपनीने नुकतीच पाहणी केली.
डोंबिवली: शहरातील एमआयडीसीतील फेज २ मधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीईटीपी) इस्त्राईलच्या कंपनीने नुकतीच पाहणी केली. कंपनीने केंद्रातील तपशीलवार माहिती घेतली आहे. कंपनीच्या सूचनेनुसार त्यांचे तांत्रिक सहाय्य घेऊन या केंद्राचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
इस्त्राईलमधील ओडीस फिल्टरिंग लिमिटेड कंपनीच्या विपणन संचालक सारी इली यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट दिली. या वेळी कंपनीचे भारतातील युनिटचे विपणन प्रमुख शैलेश सावदी, रासायनिक सांडपाणी केंद्राचे संचालक देवेन सोनी, उदय वालावलकर, उद्योजक राजू बानगावकर आदी उपस्थित होते.
रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी ओडीस कंपनीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने केंद्राची पाहणी केली. या केंद्रातून प्रक्रिया करून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यात सीओडी व बीओडीची मात्रा निकषांपेक्षा कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे.
डोंबिवलीत दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. कापड उद्योग कंपन्यांतील सांडपाण्यावर फेज १ मधील १६ दश लक्ष लिटर क्षमतेच्या केंद्रात प्रक्रिया केली जाते. फेज २ मधील दोन दश लक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया पाण्यावर प्रक्रिया केली जाते. सांडपाणी केंद्रातून निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने फेज २ मधील रासायनिक कारखान्यांना नोटीस बजावून हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. एक वर्षानंतर हे प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास लवादाने परवानगी दिली.
तांत्रिक सहाय्याचा खर्च करणार कोण?
फेज १ आणि २ या दोन्ही रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण अमेरिकी कंपनीमार्फत केले जाणार आहे. एमआयडीसी त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यातील ८२ कोटींचा खर्च फेज वनमधील तर, उर्वरित १८ कोटींचा खर्च फेज २ मधील सांडपाणी प्रक्रिया आधुनिकीकरणावर होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
कामासाठी इच्छा व्यक्त केली आहे : इस्त्राईल कंपनीकडून तांत्रिक सहाय्य घेण्याचा विषय एमआयडीसीकडे मांडला जाणार आहे. त्यामुळे हा विषय १०० कोटींच्या कामात समाविष्ट करायचा की, त्यासाठी कारखानदार स्वतंत्रपणे खर्च करतील, याबाबत निर्णय झालेला नाही, अशी माहिती फेज २च्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे संचालक सोनी यांनी दिली.