ठाण्यातील ६०५ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत तांत्रिक त्रुटी: IIT तज्ज्ञांकडून पाहणी

By जितेंद्र कालेकर | Published: June 4, 2023 07:08 PM2023-06-04T19:08:14+5:302023-06-04T19:09:11+5:30

दुरुस्तीनंतरच रस्त्याचा दर्जा अपेक्षेप्रमाणे राहणार: काही कामे समाधानकारक झाल्याचा दावा

Technical glitches in Rs 605 crore road works in Thane: Inspection by IIT experts | ठाण्यातील ६०५ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत तांत्रिक त्रुटी: IIT तज्ज्ञांकडून पाहणी

ठाण्यातील ६०५ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत तांत्रिक त्रुटी: IIT तज्ज्ञांकडून पाहणी

googlenewsNext

ठाणे : ठाणेकरांना चांगल्या दर्जाचे खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध हाेण्यासाठी ठाणे शहराला राज्य शासनाकडून मिळालेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधींतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या पहिल्या टप्प्यातील पाहणी नुकतीच आयआयटीच्या तज्ज्ञांनी पूर्ण केली. यातील काही समाधानकारक तर काही कामांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले. जिथे सुधारणा आवश्यक आहेत, तांत्रिक बाबी पाळल्या नव्हत्या, त्याबद्दल दुरुस्ती सांगण्यात आली. या गोष्टींची पूर्तता झाल्यावरच रस्त्याचा दर्जा अपेक्षेप्रमाणे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयआयटीच्या तज्ज्ञांनी ३ जून राेजी महापालिकेतील सर्व अभियंता व ठेकेदारांसमोर आढावा सादर केला. कामे तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम हाेण्यासाठी आवश्यक बदलासाठी काय करावे, याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. ठामपाने शनिवारी अभियंते आणि  ठेकेदारांसाठी नागरी संशोधन केंद्र येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर, आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. के.व्ही. क्रिष्णा राव, प्रा. सोलोमन देबार्मा आदी उपस्थित होते. आयआयटीच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. रस्त्यांच्या कामांसाठी वापरलेल्या साहित्याचा दर्जा कसा ओळखावा, कामाचे गुणवत्ता मुल्यांकन, नियंत्रण तसेच कामाची योग्य पध्दत, वातावरण व तापमान यांचा होणारा परिणाम, काम गुणवत्तापूर्वक होण्यासाठी करावयाच्या इतर बाबी, तांत्रिक बाबींचे विश्लेषण आदींचे मार्गदर्शन केले. यावेळी अभियंत्यांना रस्त्यांचे काम करतांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणींचेही निराकरण झाले. काँक्रीट भरल्यानंतर बारा तासाच्या आत ठराविक अंतरावर रस्ता कट करणे आवश्यक असते, अन्यथा रस्त्याला तडे पडण्याची शक्यता असते. तसेच मास्टीक पध्दतीचा रस्ता बनविल्यानंतर त्यावरुन वाहतूक झाली तर रस्ता गुळगुळीत होतो, अन्यथा तो खडबडीत राहतो. त्यामुळे आलटून पालटून अशा पध्दतीने प्रत्येक लेनमधून ट्रॅफिकची वाहतूक होईल, हे सुनिश्चित करण्याचे तांत्रिक सल्लेही देण्यात आले. ठामपाने रस्त्याच्या कामाचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षणासाठी आयआयटी ची नेमणूक केली. ठाणे शहरात ६०५ कोटींच्या निधीतंर्गत रस्त्यांच्या कामांचा या तज्ज्ञांनी आढावा घेतला.            

डांबरीकरणाची कामे अंतिम टप्प्यात-

२८२ कामांमध्ये २८२ ठिकाणी कोअर कटींग होते. हे नमुने आयआयटीची प्रयोगशाळा किंवा निरीक्षणाखालील इतर प्रयोगशाळांमध्ये तपासावेत. कोअर कटींगचे काम त्रयस्थ पध्दतीने ठरविले जाईल. डांबरीकरणाची व मास्टीक पध्दतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रीटची कामे लवकरच पूर्ण होतील, असा दावा बांगर यांनी केला.

Web Title: Technical glitches in Rs 605 crore road works in Thane: Inspection by IIT experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.