डोंबिवली कुंभारखान गणेश घाटावरील रेती उपश्यावर तहसीलदारांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 05:32 PM2020-09-04T17:32:27+5:302020-09-04T17:32:31+5:30
सभापतींनी केली होती तक्रार
कल्याण-डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान गणेश घाटावर होत असलेल्या अवैध रेती उपश्या प्रकरणी कल्याणच्या नायब तहसीलदारांनी कारवाई केली आहे. याठिकाणीचे साहित्य जप्त करुन संबंधितांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती.
नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी ही कारवाई आज केली आहे. रेती उपसा करणा:यांच्या विरोधात महसूल विभागाकडून कारवाई केली जाते. कोरोना काळात कारवाईकडे दुर्लक्ष झाले असल्याचे बांगर यांनी मान्य केले.
स्थायी समिती सभापती म्हात्रे यांनी सांगितले की, कुंभारखान पाडा खाडीनजीक मेरीटाईन बोर्ड व महापालिकेच्या निधीतून गणेश घाट विकसीत केला आहे. त्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. रेती उपसा करणा:यांचे ट्रक ये जा करतात. रेती साठवून ठेवली जाते. घाटानजीक मोठे ड्रेजर्स, बोटी धडकतात. दिवस रात्र याठिकाणी रेती उपसा केला जातो. त्यामुळे साडे चार कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या गणेश घाटाची दुरावस्था झाली आहे. ही बाब यंदाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी निदर्शनास आली. या प्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्तांसह तहसीलदारांना तक्रार केली होती.