रंगसंगतीमुळे अडलेले तेजस्विनी बसचे घोडे नव्या वर्षात धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:35 AM2018-12-07T05:35:58+5:302018-12-07T05:36:45+5:30
ठाणे परिवहनसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे आणि मुंबईत महिलांसाठी खास अशा तेजस्विनी बस मागील वर्षी दाखल होणार होत्या.
ठाणे : ठाणे परिवहनसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे आणि मुंबईत महिलांसाठी खास अशा तेजस्विनी बस मागील वर्षी दाखल होणार होत्या. परंतु, अद्यापही त्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. ठाणे आणि नवी मुंबईच्या ताफ्यात त्या नव्या वर्षात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, कल्याण-डोंबिवली महापालिकेची निविदा प्रक्रियाच अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. इतर महापालिकांनी या बसची तयारी जोरात सुरू केली असली, तरी राज्य शासनाकडून रंगसंगती आणि त्या बसवर कोणते छायाचित्र असावे, यावरून मागील चार ते पाच महिने चर्चेचे गुºहाळ सुरू होते. आता दोन दिवसांपूर्वीच यावर तोडगा निघाल्याने तेजस्विनीचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा होणार आहे.
महिलांना प्रवासासाठी स्वतंत्र बस उपलब्ध होऊन त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या हेतूने राज्य शासनाने तेजस्विनी बसयोजना सुरू करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण ३०० बस मिळणार आहेत. यापैकी ५० बस ठाणे शहराला मिळणार असून
नवी मुंबईला १० आणि इतर महापालिका मिळून अशा ३०० बस दाखल होणार आहेत.
>ठाण्यात सहा कोटी परिवहनकडे वर्ग
ठाणे महापालिकेत या प्रस्तावास परिवहन समिती तसेच सर्वसाधारण सभेने काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली आहे. त्यानंतर, त्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार, खरेदीसाठी परिवहन प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्या खरेदीसाठी आवश्यक असलेल्या १६ कोटींपैकी सहा कोटींचा निधी परिवहन प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. या बस जीसीसी तत्त्वावर खाजगी ठेकेदारामार्फत चालवण्यात येणार असून त्यावर चालक, वाहक नेमण्याची, शिवाय बसची देखभाल करण्याची जबाबदारीदेखील संबंधित ठेकेदाराची असणार आहे. या ५० बसवर महिला वाहक असणार आहेत.
>नवी मुंबई परिवहनसेवेत १० बस दाखल होणार आहेत. परंतु, राज्य शासनाकडून या बसची रंगसंगती कशी असावी, त्यावर छायाचित्र कोणते असावे, यासाठी त्या रस्त्यावर दाखल झाल्या नव्हत्या. आता काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडून त्याच्या गाइडलाइन्स आल्याने नव्या वर्षात त्या रस्त्यावर धावणार आहेत.
- शिरीष आदरवाड,
परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई.
>कल्याण-डोंबिवलीला मात्र ठेकेदार मिळेना...
कल्याण-डोंबिवली परिवहनसेवेमार्फत तेजस्विनी बससाठी निविदा काढण्यात आली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही तिला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली. येथे चार बस दाखल होणार असून, एक कोटी २० लाखांचा निधीसुद्धा परिवहनसेवेला प्राप्त झालेला आहे.
>ठाणे परिवहनसेवेकडून या ५० बसची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून यासंदर्भात राज्य शासनाकडून अहवालही पाठवला आहे. त्यानुसार, नवीन वर्षात या बस एकाच वेळेस राज्य शासनाने घालून दिलेल्या रंगसंगतीमध्ये आणि आकर्षक छायाचित्रासह दाखल होणार आहेत.
- संदीप माळवी, परिवहन व्यवस्थापक, ठामपा.