ठाण्यातील अभिनेत्रीला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉल सेंटरचा पर्दाफाश
By जितेंद्र कालेकर | Published: July 9, 2024 09:01 PM2024-07-09T21:01:57+5:302024-07-09T21:02:06+5:30
ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई : कर्ज न घेणाऱ्यांनाही दिला मनस्ताप
ठाणे: मोबाइल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या नातेवाइकांना तसेच इतरांना शिवीगाळ करणाऱ्या भाईंदरमधील टेली कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे खंडणी विरोधी पथकाने केला. या टोळक्याने कर्ज न घेताही ठाण्यातील एका अभिनेत्रीसह तिच्या कुटुंबीयांनाही अश्लील शिवीगाळ केल्याचे उघड झाले. राहुलकुमार दुबे (३३, रा. विरार, पालघर) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या एका सिने कलाकार तरुणीला वेगवेगळ्या क्रमांकांवरून गेल्या काही दिवसांपासून फोन येत होते. फोनवरून बोलणारी व्यक्ती ॲपवरून लोन घेतले आहे, ते भरा. अन्यथा, फोन येणे सुरूच राहील, अशी धमकी देत शिवीगाळ करीत होती. ती व्यक्ती अत्यंत अश्लील भाषेतही बोलत होती. वारंवार हाेणाऱ्या या सर्व प्रकाराला कंटाळून या तरुणीने अखेर चितळसर पोलिस ठाण्यात २ जुलै २०२४ रोजी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीसह अश्लील शिवीगाळ, धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. ज्या क्रमांकावरून फोन येत होते, त्या मोबाइल क्रमांकाची माहिती मिळविण्यात आली. ज्याच्या नावाने हे सिम कार्ड आहे, त्याची चौकशी केली. तेव्हा संबंधित व्यक्तीने कोणतेही सिम कार्ड विकत घेतले नसल्याची बाब निदर्शनास आली. या मोबाइल सिम कार्डची विक्री कोठून झाली, त्याची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक वनिता पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे, भूषण कापडणीस, श्रीकृष्ण गोरे, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आणि सुभाष तावडे आदींच्या पथकाने अंधेरीतील वायरलेस कनेक्ट व्हीआय कंपनीचा सिम कार्ड विक्रेता राहुलकुमार दुबे (३३, विरार) याला ताब्यात घेतले. कंपनीने सिम कर्ड विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आलेल्या ग्राहकांच्या नावावर दोन ते तीन सिम कार्ड काढल्याचे व त्यापैकी एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उरलेली सिम कार्ड लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटरला विकल्याचीही कबुली दिली. त्यानंतर दुबेला ३ जुलै २०२४ रोजी रात्री अटक केली. त्याच्या माहितीच्या आधारे या पथकाने सिटीझन कॅपिटल या भाईंदर येथील लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटरवर छापा मारला.
यावेळी पोलिसांनी टेलीकॉल सेंटर चालक शुभम ओझा (२९, रा.मीरा रोड) आणि अमित पाठक (३३ , मालाड, मुंबई) या फोनवरून बोलणाऱ्या टेलीकॉलरला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांच्याकडे स्लाइस फायनान्स, कोटक बँक, आयडीएफसी फस्ट बँक यांच्या लोन रिकव्हरीचे काम ॲग्रीमेंट करून दिल्याची माहिती उघड झाली. लोन वसुलीसाठी फोन करून ग्राहकांना शिवीगाळ करून धमकी देत असल्याचे आढळले. इतकेच नव्हे, तर लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या फोन लिस्टमधील मोबाइल क्रमांकावर फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत असल्याचेही स्पष्ट झाले. दुबे, ओझा व पाठक तिघांनाही १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या आरोपींकडून संगणकातील चार एसएसडी हार्डडिस्क, एक जीएसएम गेटवे, एक २४ पोर्ट स्विच, एक राउटर आणि तीन मोबाइल असा ७७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
...तर पोलिसांकडे तक्रार करा-
अशाच प्रकारे लोन रिकव्हरीच्या नावाखाली अर्वाच्य भाषेत शिवीगाळ किंवा अश्लील भाषेत बोलून छळवणूक हाेत असल्यास संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले.