मुलांना सांगा, युद्धाच्या प्रेरणादायी कथा!
By admin | Published: January 24, 2017 05:38 AM2017-01-24T05:38:10+5:302017-01-24T05:38:10+5:30
देशाने राष्ट्रहितासाठी जी युध्दे केली आणि पराक्रम गाजविला, त्या पराक्रमांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती नाही. देशाचा अभिमान
बदलापूर : देशाने राष्ट्रहितासाठी जी युध्दे केली आणि पराक्रम गाजविला, त्या पराक्रमांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती नाही. देशाचा अभिमान सार्थपणे सांगणाऱ्या युद्धकथाच लहान मुलांना, विद्यार्थ्यांना सांगितल्या जात नाहीत, अशी खंत वीरमाता अनुराधा गोरे यांनी व्यक्त केली.
१५ जानेवारीच्या लष्कर दिनाच्या पार्शवभूमीवर हे व्याख्यान झाले. ‘युध्दस्य कथा रम्य:’ या विषयावर गोरे बोलल्या. त्यात त्यांनी युद्धकथांचा मुद्दा उपस्थित केला. मूर्ती लहान आणि कीर्ती महान याप्रमाणे प्रख्यात असलेले तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यात प्रचंड हिम्मत होती. १९७१ च्या युद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांनी एका क्षणात हवाई दलाला आक्र मणाचे आदेश दिले आणि आदेश दिल्यांनतर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना कल्पना दिली. म्हणूनच आपण त्यावेळी युद्धात कमीत कमी जवान व युद्धसाहित्य गमावून युद्ध जिंकू शकलो होतो. त्यावेळेपासून ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला’ असे म्हटले जाते, असा संदर्भ त्यांनी सांगितला.
‘सैन्य’ या शब्दातच प्रचंड ऊर्जा आहे. आपल्या कुटुंबियांपैकी कोणी सैन्यात आहे म्हटल्यावर घरात वेगळेच वातावरण तयार होत असते. प्रत्येकाच्या अंगात वेगळेच चैतन्य त्यामुळे निर्माण होत असल्याचा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे. तोच अनुभव नवीन पिढीला मिळावा, यासाठीच मी सतत फिरत असते. एखाद्या घरातील युवक जर युद्धात शहीद झाला, तर त्यांच्या घरातील वातावरण दु:खी असले तरी त्या दु:खातही त्यांच्यात देशाचा सार्थ अभिमान पाहावयास मिळतो, असा अनुभव गोरे यांनी सांगितला.
देशात शांततेच्या काळात जे जवान कायम आपला घाम गाळत असतात. प्रत्यक्ष युद्धात कमी रक्त सांडून युद्ध सहज जिंकता येते, हे आपल्या तिन्ही दलातील जवानांनी अनेक वेळा दाखवून दिलेले आहे. जसवंत सिंह, सैतानसिंह, रामलिंग आदींसारख्या अनेक वीर जवानांच्या शौर्यकथांची डॉक्युमेंट्री काढून विद्यार्थ्यांना दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सुहृद’च्या उन्मेषा कीर्तने यांनी स्वागत व प्रास्तविक केले. (प्रतिनिधी)