कळवा, मुंब्रा दिव्यात वीजेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 03:42 PM2020-04-18T15:42:30+5:302020-04-18T15:43:17+5:30
एकीकडे कोरोनाचे संकट घोगांवत असतांना दुसरीकडे दिवा आणि मुंब्य्राच्या भागात मागील १४ तास वीज गायब होती. त्यामुळे येथील नागरीक हैराण झाले होते. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास खंडीत झालेला वीज पुरवठा शनिवारी दुपारी १ वाजता सुरळीत झाला. तर कळव्यातही शनिवारी साडेचार तास वीज पुरवठा खंडीत होता.
ठाणे : आधीच कोरोनामुळे नागरीक घरातच लॉकडाऊन झाले आहेत. त्यात आता दिवा भागात मागील १४ तास अंधार असल्याची माहिती पुढे आली आहे. या भागातील वीज पुरवठा रात्री ९.३० च्या सुमारास खंडीत झाला होता. तो शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ववद झाल्याचे दिसून आले. त्यात ऊन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतांना, दुसरीकडे कोरोनामुळे बाहेरही जाऊ शकत नसल्याने येथील नागरीकांनी टोरेन्ट विरोधात संताप व्यक्त केला. तर मुंब्य्राच्या काही भागातही वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे कळव्यात शनिवारी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता.
दिव्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे, त्यानंतर आता येथे आता घरातून कोणीच बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येथील नागरीक घरातच राहणे पसंत करीत आहेत. परंतु सध्या उन्हामुळे अंगाची एवढी लाहीलाही होत आहे की, त्यामुळे नागरीकांना घरात २४ तास पंखा लावण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. असे असतांना दिव्यात पुन्हा एकदा विजेचा समस्येला येथील नागरीकांना सामोरे जाण्याची वेळ आली. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास येथील वीज पुरवठा खंडीत झाला होता. परंतु तो का खंडीत झाला, वीज प्रवाह केव्ह सुरळीत होणार याचे कोणतेही उत्तर टोरेन्टकडून देण्यात येत नव्हते. त्यामुळे नागरीक चांगलेच संतापल्याचे दिसून आले. अखेर शनिवारी दुपारी १ च्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान या संदर्भात रात्री १० च्या सुमारास तक्रारी आल्याचे टोरेन्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.त्यानुसार फडकेपाडा (साबे फीडर) येथील भुमीगत एचटी केबलमध्य बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रात्रभर टीम येथे काम करीत होती. त्यानुसार या भागात ६५ मीटर ओव्हरहेड केबल तात्पुरती टाकण्यात येऊन दुपारी १ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती टोरोन्टे माहिती जनसंपर्क अधिकारी चेतन भदियानी यांनी दिली. तर भुमीगत केबलच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तर याच कालावधीत मुंब्य्राच्या काही भागातही वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे कळवा भागात शनिवारी सकाळी ९.३० वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत होण्यास दुपारी २ वाजले. त्यानंतर या भागाचा वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे.