सांगा तुम्हाला कोणत्या ठिकाणचा आवडतो वडापाव? नेटकऱ्यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:56+5:302021-08-24T04:43:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गरिबांचा बर्गर म्हणून आजही वडापावकडे पाहिले जाते. २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गरिबांचा बर्गर म्हणून आजही वडापावकडे पाहिले जाते. २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन. त्यामुळे दिवसभर सोशल मीडियावर वडपावचे फोटो टाकून "सांगा तुम्हाला कोणत्या ठिकाणचा वडापाव आवडतो?" असा प्रश्न विचारून आपापल्या आवडत्या वडापावचे ठिकाण लिहिले जात होते तर अनेक ठाणेकरांनी मुद्दामूनच या दिवशी डाएट बाजूला ठेवून वडापाववर ताव मारला.
सकाळचा नाश्ता असो, दुपारचे जेवण की संध्याकाळचे स्नॅक्स, कोणत्याही वेळी खाल्ला जाणारा झणझणीत तिखट असा पदार्थ म्हणजे वडापाव. वडापाव म्हटले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अगदी गाडीपासून मॉलपर्यंत वडापाव विकला जातो. वर्षानुवर्षे पंसतीच्या ठिकाणी जाऊन वडापाव खाणारे जसे ठाणेकर आहेत. तसे नवीन वडापाव सुरू झाला की त्याची चव बघणारेही आहेत. ठाणे आणि वडापाव जुने नाते आहे. ठाणेकरांनी तर त्या त्या वडापावच्या वैशिष्ट्यानुसार वडापावला नावे पाडली आहेत. आज नेटकऱ्यांना या दिवसाची आठवण झाल्याने तशा पोस्ट टाकून लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
-------------------------
ठाण्यात मो. ह. विद्यालयात शिकत असल्याने शाळेसमोरच असणारा वडापाव खाण्याचा कधी मोह आवरताच आला नाही. त्यानंतर वडापाव किंवा वडापाव सेंटर आले की त्याठिकाणी जाऊन त्या झणझणीत पिवळ्या चटणीबरोबर गरमागरम वडापाव दोन पावात खाणे म्हणजे जेवण झाल्याचाच अनुभव.
- सर्वेश तरे
.........
डाएटवर असल्यामुळे वडापाव नेहमी खाणे कमी केले आहे. तरीही वडापावची गाडी दिसली की मोह आवरत नाही. जागतिक वडापाव दिनानिमित्ताने डाएट बाजूला सारून, विसरून मनोसक्त वडापाव खाल्ले, मन तृप्त झाले.
- अजय नाईक
..
बऱ्याच वेळा कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागते. प्रत्येक वेळा वेळेत जेवण मिळतेच, असे नाही; पण गरमागरम मिळणारा वडापाव सहज उपलब्ध होतो. भूक तर भागतेच; पण खिशालादेखील प्ररवडतो. काही ठिकाणचे प्रसिद्ध वडापाव जाऊन खाण्यात तर खास मजा येते.
- विश्वास उदगीरकर.