सीडीआर प्रकरणामध्ये तेलुगू अभिनेत्रीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:01 AM2018-05-11T05:01:40+5:302018-05-11T05:01:40+5:30
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका तेलुगू अभिनेत्रीची चौकशी केली. अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे.
ठाणे - बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका तेलुगू अभिनेत्रीची चौकशी केली. अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे.
सीडीआर प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने १४ मार्च रोजी अॅड. रिझवान सिद्दीकी यांना अटक केली होती. अनेक बॉलिवूड अभिनेत्यांचे वकील असलेल्या अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी सीडीआर प्रकरणातील आरोपीकडून बेकायदेशीर सीडीआर मिळवल्याचा आरोप आहे. अॅड. सिद्दीकी यांचे मोबाइल फोन्स तपासण्याचे काम सुरू असतानाच, त्यांच्याविरोधात दोन तक्रारी पोलिसांकडे आल्या. त्यापैकी एक तेलुगू अभिनेत्री आकृती नागपाल यांची होती.
चार वर्षांपूर्वी आकृती यांच्या पतीने मुंबई न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. अॅड. सिद्दीकी हे त्यांचे पती अनिल मिस्त्री यांचे वकील आहेत. आकृती यांचे कॉल रेकॉर्ड आपल्याजवळ असून ते आपण न्यायालयाला सादर करू शकतो, असे त्यांचे पती अनिल मिस्त्री यांनी न्यायालयामध्ये म्हटले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपले सीडीआर मिळवण्यासाठी अॅड. सिद्दीकींनी पतीला मदत केली असावी, असा संशय या अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. याबाबत आकृती यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून या तक्रारीचा पाठपुरावा करण्याची विनंती आकृती यांनी गुरुवारी पोलिसांना केली.