उड्डाणपुलाजवळ हाईट बॅरियरला टेम्पोची धडक, चालक जखमी; नाशिक-मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी
By जितेंद्र कालेकर | Published: April 15, 2024 05:24 PM2024-04-15T17:24:53+5:302024-04-15T17:26:11+5:30
माजीवडा येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नाशिक मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलाजवळ लोखंडी हाईट बॅरियरला एका टेम्पोने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात प्रविणकुमार अग्निहोत्री (३३, रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे) हा टेम्पोचालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे या मार्गावर अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या मदतीने बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक-मुंबई या मार्गावर माजिवाडा ब्रिजजवळ नाशिक ते मुंबईकडे जाणाऱ्या रोडवर माजिवाडा ब्रिजजवळ असलेल्या हाईट बॅरियरला टेम्पोने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांनी एका हायड्रा मशीनसह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या धाव घेतली. या अपघातात टेम्पो चालक अग्निहोत्री हा जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त तीनचाकी टेम्पो हायड्रा मशीनच्या सहाय्याने रोडच्या बाजूला करण्यात आला. या अपघातामुळे या मार्गावर सुमारे ४० ते ४५ मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. बॅरियरला धडकलेला टेम्पो बाहेर काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती वाहतूक शाखेच्या कापूरबावडी उपविभागाच्या पोलिसांनी दिली.
माजीवडा ब्रिजजवळ मोठी वाहने ठाण्यातून मंबईत जात असतांना त्यांनी शहरात शिरणाऱ्या रस्त्याचा वापर करण्याऐवजी उड्डाणपूलाचा वापर करावा, यासाठी पूलाच्या बाजूलाच हाईट बॅरियर लावले आहेत. याच बॅरियरला हा टेम्पो अचानक येऊन धडकल्याने हा अपघात झाला. असा अपघात होऊ नये, यासाठी काही अंतरावर फलक असावेत. तसेच सिग्नल यंत्रणाही असावी, अशी मागणी काही वाहन चालकांनी केली आहे.