भिवंडीत नऊ लाखांच्या गुटख्यासह टेम्पो, मोटार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:45 AM2021-09-23T04:45:41+5:302021-09-23T04:45:41+5:30
भिवंडी : भिवंडी परिसरात शेजारील गुजरात राज्यातून नियमित गुटखा येतो. एका टेम्पोतून आलेला नऊ लाख ३१ हजार ८४० रुपये ...
भिवंडी : भिवंडी परिसरात शेजारील गुजरात राज्यातून नियमित गुटखा येतो. एका टेम्पोतून आलेला नऊ लाख ३१ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा गुन्हे शाखेचे पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी रविवारी जप्त केला. तसेच टेम्पो व मोटारही ताब्यात घेतली.
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, नदीनाका येथून एका टेम्पोतून गुटखा येणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस पथक व अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांनी नदीनाका परिसरात सापळा रचून टेम्पोचा चालक व क्लीनर यांना ताब्यात घेऊन टेम्पोची तपासणी केली असता एकूण ३० गोणींमध्ये प्रतिबंधित केलेला नऊ लाख ३१ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा आढळला. या सोबत आठ लाख रुपये किमतीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चौकशी केली असता अन्य एका मोटारीमधील व्यक्तींच्या सांगण्यावरून हा गुटखा आणल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र त्या मोटारीतील चालकाने मोटार सोडून पळ काढला. पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीची मोटार ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण २२ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा गुटखा, टेम्पो व मोटार जप्त करून टेम्पोचा चालक व क्लीनर यांना अटक केली.
------------