घोडबंदर रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मोठ्या वाहनांना तात्पुरती बंदी
By जितेंद्र कालेकर | Published: August 4, 2023 11:28 PM2023-08-04T23:28:24+5:302023-08-04T23:28:58+5:30
घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
ठाणे : ठाण्यातील मेट्रो ४च्या कामासाठी पिलरवर गर्डर टाकण्याचे काम सध्या घोडबंदर रोड परिसरात सुरू आहे. याच कामासाठी ठाणे ते घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या वाहनांना ३ ते ११ ऑगस्ट पहाटे ५ पर्यंत बंदी घातल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी दिली.
घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी ही वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा येथून वळण घेऊन खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटामार्गे जातील. तसेच कशेळी, अंजूर फाटामार्गे जातील. त्याचप्रमाणे मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद राहणार असून, ही वाहने गॅमनमार्गे खारेगाव ब्रिज खालून खारेगाव टोलनाका मानकोली, अंजूर फाटामार्गे जातील. तसेच नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व ट्रेलर, ट्रक आणि टँकर अशा मोठ्या वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेऊन अंजूर फाटा मार्गे जातील.
या वेळेमध्ये वाहनांना प्रवेश बंद
मोठ्या वाहनांना ४ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ ते ५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत प्रवेश बंद केला आहे. असाच बदल ५ ते ११ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये राहणार आहे.
याठिकाणी होणार गर्डरचे काम
ठाण्यातील मानपाडा येथे गर्डर पी ८५-८६ चे काम करताना मानपाडा ब्रिजखालून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहने मानपाडा ब्रिज ते टिकूजिनीवाडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन नीळकंठ ग्रीन सोसायटीमार्गे मुल्ला बाग येथून मुख्य रस्त्याला मिळून पुढे जातील. तसेच कासारवडवली येथे आय गर्डर १८८-१८९चे काम करताना आनंदनगर सिग्नलजवळून सेवा रस्त्याने पुढे कासारवडवली पेट्रोलपंपजवळ उजवे वळण घेऊन मुख्य रस्त्याला मिळून पुढे जातील, असे वाहतूक शाखेने म्हटले आहे.