तात्पुरती ‘मलमपट्टी’ ठरतेय कुचकामी, डोंबिवलीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:35 AM2017-08-11T05:35:19+5:302017-08-11T05:35:19+5:30
गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच डांबराचा भराव टाकून ते बुजवण्याचा प्रताप त्यांच्याकडून सुरू आहे.
- प्रशांत माने
डोंबिवली : गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच डांबराचा भराव टाकून ते बुजवण्याचा प्रताप त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे ही तात्पुरती डागडुजी एक प्रकारे थुंकपट्टी ठरत आहे.
गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांमध्ये चरी भरा तसेच खड्डे बुजवलेल्या रस्त्यांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर द्या, अशा सूचना वेलरासू यांनी अधिकाºयांना दिल्या होत्या. पावसापूर्वी, ऐन पावसात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याची तसेच रस्ता दुरुस्तीची कामे केली जातात. यंदाच्या अंदाजपत्रकात खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ११ कंत्राटदारांवर ही कामे सोपवली आहेत.
पावसामुळे सध्या डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या खड्डेमय परिस्थितीचे पडसाद उमटले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप सर्व पक्षांच्या सदस्यांनी या वेळी केला. त्यावर गणेश विसर्जन मार्गावरील प्रमुख रस्त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल आणि तेथील खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती.
मात्र, आयुक्त आणि स्थायी समितीने दिलेल्या निर्देशानुसार खड्डे बुजवण्यास प्रारंभ झाला असला, तरी काम करण्याची पद्धत पाहता गणेशोत्सवाच्या धर्तीवर केली जाणारी डागडुजी दिखावा ठरत आहे.
पाणी आणि डांबर हे परस्परविरोधी घटक मानले जातात. पाण्यात डांबर टिकाव धरत नाही. असे असले तरी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकून ते बुजवले जात असल्याचे चित्र डोंबिवली शहरातीले टिळक चौक ते घरडा सर्कलदरम्यान पाथर्ली नाका येथे गुरुवारी पाहावयास मिळाले. खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकला जात असताना त्यावर योग्य प्रकारे रोलर फिरवला जात नसल्याने ओबडधोबड आकाराचे निर्माण होणारे ‘पॅच’ आणखी त्रासदायक ठरत आहेत. त्यात खड्ड्यांतील पाण्यावर डांबराचा शिडकावा केला गेल्याने अल्पावधीतच ते डांबर पुन्हा उखडले जाऊन पुन्हा खड्डेमय स्थिती उद्भवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मागील आठवड्यातच शहरातील काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची कामे झाली होती. परंतु, काही दिवसांतच पुन्हा खड्डे निर्माण झाल्याने यातून निकृष्ट कामांचा नमूनाही पुढे आला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
...तर समज देणार
यासंदर्भात केडीएमसीतील बांधकाम विभागाचे डोंबिवलीतील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या धर्तीवर तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार सध्या खड्डे बुजवण्याची कामे सुरू आहेत.
पाणी भरलेल्या खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकून बुजवण्याचा प्रकार होत असेल, तर संबंधित कंत्राटदाराला समज देण्यात येईल.
दरम्यान, काम सुरू असतानाच पाऊस आल्याचे स्पष्टीकरण संबंधित कंत्राटदाराने दिल्याचे पाटील यांनी पुढे सांगितले.