क्लस्टरच्या रहिवाशांचे म्हाडाच्या योजनेत तात्पुरते पुनर्वसन - राधाकृष्ण विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:12 AM2019-07-19T01:12:11+5:302019-07-19T01:12:21+5:30
ठाण्याचा विकास हा झपाट्याने होत असून क्लस्टरसारखी योजना येथे सुरू होत आहे.
ठाणे : ठाण्याचा विकास हा झपाट्याने होत असून क्लस्टरसारखी योजना येथे सुरू होत आहे. परंतु, ती राबवत असताना येथील रहिवाशांचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात म्हाडा आणि विविध योजनांमध्ये केल्यास ही योजना लवकरात लवकर मार्गी लागू शकेल. तसेच परवडणारी घरांची योजनाही मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून या योजनांमध्ये ज्या काही त्रुटी असतील, त्या दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक आयोजिली असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
गुरुवारी त्यांनी ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाण्यात म्हाडा, एसआरएअंतर्गत विविध योजना सुरू असून परवडणाऱ्या घरांची योजनाही राबवली जात आहे. तसेच म्हाडाच्या काही प्लॉटची मागणी महापालिका आयुक्तांकडून झाली आहे. त्यानुसार, यासंदर्भात पत्र देण्याच्या सूचना त्यांना केल्याचेही त्यांनी सांगितले. आता या सर्वांवर तोडगा काढून या योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
क्लस्टर योजनेला गती द्यायची असेल, तर या योजनेतील रहिवाशांचे म्हाडा किंवा इतर योजनांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केल्यास ती लवकर मार्गी लागेल. त्यानुसार, म्हाडामध्ये कशा पद्धतीने ते करता येईल, याचीही चर्चा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
>विधानसभा निवडणुकीपूर्वी क्लस्टरचा नारळ वाढविणार
ठाणे शहरात सध्या सहा विभागांत क्लस्टरचा सर्व्हे जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. त्यानुसार, मागील कित्येक वर्षे रखडलेला या योजनेचा नारळ येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढविला जाईल, असे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. या योजनेतील लीजचा जो काही प्रश्न उपस्थित झाला आहे, तो न्यायालयाशी निगडित असल्याने त्यावरदेखील तोडगा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
>शिवसेनेचा
मोर्चा योग्यच
शिवसेनेने पीकविमा कंपन्याविरोधात काढलेल्या मोर्चाचे समर्थन करून विखे-पाटील यांनी या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या कंपन्यांवर दबाव आणण्याची गरजही होतीच, त्यामुळे शिवसेनेने जे केले ते योग्यच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना आता मागील साडेचार वर्षांत विविध योजनांचा लाभ झाला आहे. यापूर्वी मी विरोधी बाकावर होतो, त्यावेळेस ज्या काही मागण्या केल्या त्या भाजप सरकारने साडेचार वर्षांत पूर्ण केल्या आहेत.
>राज्याचे गृहनिर्माणमंत्री थेट ठाणे महाालिका आयुक्तांच्या दारी आल्याने साºयांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्र्यांची ही भेट शासकीय होती की खासगी याबाबत आता ठाण्यात विविध एसआरए, क्लस्टर योजनांच्या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.