सरकारी नोकरी लावण्याचे अमिष: साडे नऊ लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:32 PM2018-11-16T22:32:42+5:302018-11-16T23:02:43+5:30
सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवत सुशिक्षित तरुणांना साडे नऊ लाखांचा गंडा घालणाºया निरज सोनवणे (२४, रा. औरंगाबाद) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने नुकतीच अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राजमुद्रा आणि भारत सरकारच्या नावाचा बेकायदेशीरपणे वापर करुन सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवत सुशिक्षित तरुणांना साडे नऊ लाखांचा गंडा घालणा-या निरज सोनवणे (२४, रा. औरंगाबाद) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने नुकतीच अटक केली आहे. त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या हॉटेल स्क्वेअर जवळील भाजी मार्केट येथे एका वाहनावर गव्हरमेंट आॅफ इंडिया, कौसिल आॅफ आर्किटेक्चर, मिनिस्टरी आॅफ लेबर अॅन्ड एप्लॉयमेंट, नवी दिल्ली या नावाने शासनाची राजमुद्रा आणि भारत सरकार असा बोर्ड लावलेला आढळला. या गाडीतील व्यक्ती अशा कोणत्याही कमिटीचा सदस्य नसतांना तो ते वापरत असल्याची टीप १३ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरज सोनवणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तेंव्हा त्याने कमिटीचा सदस्य असल्याचे स्वत:चे नावाचा उल्लेखासह राजमुद्रा असलेले बनावट लेटर पॅड , ओळखपत्र, नावाची पाटी असे तयार करुन तो लोकसेवक नसतांनाही त्याने लोकसेवकाची बतावणी करुन तोतयागिरी केली. तसेच त्याने जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अनेक युवकांना अशाच प्रकारे तयार केलेल्या बनावट राजमुद्रा, बनावट ओळखपत्र आणि लेटरपॅड दाखवून शासकीय सेवेत नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. याच प्रभावातून त्यांच्याकडून रोखीने आणि बँक खात्यामार्फत साडे नऊ लाखांची रक्कम घेतली. मात्र कोणालाही नोकरीला न लावता त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच एका साक्षीदाराचे तलाठी पदासाठी ठाण्याच्या तहसिलदार यांची खोटी स्वाक्षरी करुन बनावट ओळखपत्र तयार केल्याचेही चौकशीत उघड झाले. याप्रकरणी निरज विरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.