ठाण्यात पैशाचे अमिषाने महिलांना शरीरविक्रयास लावणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:19 PM2019-02-20T22:19:42+5:302019-02-20T22:24:42+5:30
गरिब, गरजू महिलांना पैशांच्या अमिषाने शरिर विक्रयास लावणा-या रेणुका शिंदे या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे: पैशांचे अमिष दाखवून महिलांना शरीर विक्रयास भाग पाडणा-या रेणुका शिंदे (३५) या महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री मॉडेला चेक नाका येथील गोपाळआश्रम बार अॅन्ड रेस्टॉरन्ट येथून अटक केली. तिच्या ताब्यातून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर रोडवरील ओवाळा नाका येथे राहणारी रेणुका ही महिला काही गरीब आणि गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून नोकरी लावण्याच्या नावाखाली शरीर विक्र याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दौंडकर यांच्यासह उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार राजू महाले, हवालदार विजय बडगुजर, विजय पवार, अंक्षिता मिसाळ, अक्षदा साळवी आणि निशा कारंडे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. बनावट गि-हाईक पाठवून या प्रकाराची खात्री करण्यात आली. त्यावेळी पाच हजारांमध्ये रेणुकाने एका महिलेचा सौदा केला. लोणावळयातील हॉटेलमध्ये तिला नेण्याचे ठरले. त्याचवेही हॉटेल गोपालआश्रम मध्ये या पथकाने रेणुकाला ताब्यात घेतले. साईराज आणि उदय या दोघांच्या मदतीने ती हा अनैतिक व्यवसाय करीत होती. पाच हजारांमधून एक पिडीत महिलेकडे दोन हजार रुपये सोपवून उर्वरित तीन हजार रुपये ती तिघांमध्ये वाटून घेत होती. तिच्याविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तिच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.