रेल्वेत नोकरीच्या प्रलोभनाने साडेतीन लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:51 PM2019-06-10T22:51:35+5:302019-06-10T22:52:35+5:30
कोसलेगावात राहणारा तक्रारदार महेंद्र याला शेरे गावातील त्याचा मित्र भरत गोंधळी याने रेल्वेतील मोठे अधिकारी येणार असल्याचे सांगून टिटवाळा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले.
वासिंद : रेल्वेत नोकरीला लावतो, असे सांगून मित्रानेच तरुणाची साडेतीन लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महेंद्र पारधी असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोसलेगावात राहणारा तक्रारदार महेंद्र याला शेरे गावातील त्याचा मित्र भरत गोंधळी याने रेल्वेतील मोठे अधिकारी येणार असल्याचे सांगून टिटवाळा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे गेल्यावर गोंधळी याने रेल्वेत नोकरी लावण्यासाठी साडेतीन लाख रुपये मागितले. महेंद्रकडून पैसे घेतल्यानंतर सहा महिन्यांत रेल्वेकडून टीसी (तिकीट तपासनीस) या पदाचे नियुक्तीपत्र येईल, असे गोंधळीने सांगितले होते. मात्र, सहा महिन्यांनंतरही पत्र न आल्याने गोंधळी याच्याकडे महेंद्रने विचारणा केली असता तुझ्या आधीच्या १० लोकांची कामे चालू आहेत, तसेच मराठी टायपिंगचे ४० च्या स्पीडचे प्रमाणपत्र नसल्याचे सांगून त्यासाठी आणखी १० हजार मागितले. तडजोडीनंतर महेंद्रने पाच हजार रुपये दिले. त्यानंतर, दोन दिवसांनी महेंद्रला प्रमाणपत्र मिळाले, मात्र ते बनावट होते. नियुक्तीपत्राबाबत विचारणा केल्यास गोंधळी हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. फसवणूक झाल्याचे उघड होताच महेंद्र याने वासिंद पोलिसांत धाव घेऊ न तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.