नोकरीच्या प्रलोभनाने तरुणांची फसवणूक
By admin | Published: October 26, 2016 05:22 AM2016-10-26T05:22:39+5:302016-10-26T05:22:39+5:30
नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील पाटकर बिल्डिंगमधील जीसीसी रिक्रूटमेंट या प्लेसमेंटमधील दुकलीने उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांकडून
डोंबिवली : नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील पाटकर बिल्डिंगमधील जीसीसी रिक्रूटमेंट या प्लेसमेंटमधील दुकलीने उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी केला आहे. याप्रकरणी नाईक यांनी या दुकलीला घेऊन रामनगर पोलीस ठाणे गाठले. मात्र, फसवणूक झालेल्यांपैकी कोणीही फिर्याद न दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
जीसीसी रिक्रूटमेंट या प्लेसमेंटमधील व्यवस्थापक हुमैर मोहमद कलीम खान आणि कृष्णा कुमार गुप्ता यांनी बँक, सुरक्षारक्षक, कॉलिंग बॉय, आॅफिस बॉय आदी पदांवर बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची हमी जाहिरातीद्वारे दिली होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी ६५० रु पये घेतले. पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने अनेक तरु णांनी पूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत धाव घेतली. त्यांनी सर्व प्रकार शाखाप्रमुख नाईक यांच्या कानावर हा प्रकार घातला. मात्र, तरुणांनी भीतीपोटी प्लेसमेंटचालक आणि पोलिसांसमोर जाण्यास नकार दिला. या फसवणुकीविरोधात नाईक यांनी बेरोजगार मुलांच्या वतीने प्लेसमेंट कार्यालय गाठून जाब विचारला. त्यावेळी हुमैर खान हिने आपले नाव सोनाली गुप्ता तर कृष्णाने राजू असे नाव सांगितले. त्यांनी खोटी नावे तसेच उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नाईक यांनी त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी या प्रकाराबाबत दुकलीला धारेवर धरत जाब विचारला. मात्र, फसगत झालेला एकही तरु ण पुढे आला नाही.
फसवणूक झालेला एकही बेरोजगार तरुण पुढे न आल्याने गुन्हा दाखल न करता ‘जीसीसी रिक्रूटमेंट’च्या दुकलीला सोडून दिले आहे. मात्र, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात ते दोषी अढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- विलास शेंडे, पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे
शिवसेना शाखेत संपर्क साधा
‘जीसीसी रिक्रूटमेंट’मध्ये नोकरीसाठी पैसे भरलेल्या आणि ती न मिळाल्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांनी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी केले आहे.