आचारसंहिता पथकाची धडक कारवाई; भिवंडीतून दहा लाख जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 09:11 AM2019-09-27T09:11:26+5:302019-09-27T09:15:07+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाल्यानंतर भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
ठाणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाल्यानंतर भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. याकामी 137 भिवंडी पूर्व अंतर्गत शहरात येणार्या सर्व वाहनांची तपासणी करण्याचे विशेष आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी संबंधितांना दिले आहेत. याकरता आचारसंहिता पथक, विशेष भरारी पथक वाहन तपास पथक देखील स्थापन करण्यात आलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (26 सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास या पथकामार्फत चावीन्द्रा तपासणी नाका येथे शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना हुंडाई आय टेन वाहन क्रमांक MHO5. CV.7016 या वाहनांची तपासणी केली असता या वाहनांमध्ये अवैधरित्या रक्कम रुपये दहा लाख रुपये आढळून आले. याबाबत वाहन चालक यांचेकडे चौकशी केली असता वाहन चालक सुरेश धर्माणी यांनी कोणत्याही प्रकारे सदर रक्कमबाबत कागदपत्रे तपासणी पथकाकडे सादर केली नाहीत किंवा या रकमेबाबत कोणत्या प्रकारे खुलासा केला नसल्याने, 137 भिवंडी पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी सदरची रक्कम भिवंडी ट्रेझरी मध्ये जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदरची रक्कम भिवंडी ट्रेझरी मध्ये जमा करण्यात आली आहे. याकामी आचार संहिता नोडल ऑफिसर प्रमुख पंढरीनाथ वेखंडे यांचे मार्गदर्शनाखाली, आचारसंहिता व्यस्थापन प्रमुख सुभाष झळके, एस.एस.टी पथक प्रमुख सहायक रवींद्र शांताराम मदन आणि प्रकाश पाटील यांच्या आचारसंहिता पथक व विशेष तपास पथकाने पोलीस कर्मचारी यांनी सदरची कारवाई केलेली आहे.