लग्नासाठी तगादा लावणाऱ्या बारबालेचा खून करणाऱ्यास दहा महिन्यांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:27 PM2019-03-28T19:27:52+5:302019-03-28T19:43:48+5:30
ठाणे : अनैतिक संबंधातून लग्नासाठी तगादा लावून कुटूंबाला संपवून टाकण्याची धमकी देणारी बारबाला फुतूली उर्फ फरीदाखातून उर्फ मिम (२५) ...
ठाणे: अनैतिक संबंधातून लग्नासाठी तगादा लावून कुटूंबाला संपवून टाकण्याची धमकी देणारी बारबाला फुतूली उर्फ फरीदाखातून उर्फ मिम (२५) हिचा दहा महिन्यांपूर्वी खून करणा-या मजिद मंडल याला मुंब्रा येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
एका बारबालेचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना १ मे २०१८ रोजी डोंबिवलीतील गोलवली, उपाध्याय चाळीत घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलिसांप्रमाणे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाकडूनही तपास करण्यात येत होता.
फुतूलीच्या खूनानंतर मारेकरी घराला बाहेरून कुलूप लावून पळून गेला होता. चाळ मालक राजकुमार उपाध्याय याच्या तक्र ारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. या खूनाबाबत कोणताही पुरावा नसल्यामुळे पोलिसासमोर तपासाचे मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असतांना सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद जगदेव, उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि दिनेश शेलार आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खून झालेल्या या बारबालेचा मोबाईल क्रमांक मिळविला. तिच्या फोनचे लोकेशन कोलकता येथे मिळाले. त्यानुसार एका पथकाने कोलकाता येथे जाऊन तपास केला. हा मोबाइल राज मंडल (रा. लष्करपूर, कोलकाता) या व्यक्तीकडे आढळला. पोलिसांनी हा मोबाईल हस्तगत केला. तेंव्हा या महिलेसाबत माजीदुल मंडल नामक व्यक्ती वास्तव्याला होती. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. माजीदुल याचा काहीच शोध लागला नाही. दरम्यान, माजीदुल हा २८ मार्च २०१९ रोजी पहाटे ४.३० वा. च्या सुमारास ठाण्याच्या मुंब्रा येथील कौसा कब्रस्थान येथे येणार असल्याची माहिती होनराव यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने कौसा येथे सापळा लावून माजीदुल यास अटक केली. तो विवाहित होता. तरीही फुजुली हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध हाते. यातूनच त्याच्या पत्नीशी तिचा वादही झाला होता. त्याने तिला एका बारमध्ये वेटर म्हणून नोकरीला लावले होते. त्याची पत्नी आणि मुलगी ही गावी असतांना फुतुली हिने त्याला लग्नाचा तगादा लावला. जर लग्न केले नाही तर तुझ्या कुटूंबाला संपवून टाकेल, अशी धमकीही तिने त्याला दिली होती. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने २८ एप्रिल २०१८ रोजी ओढणीने गळा आवळून तिचा खून केल्याची कबूली त्याने दिल्याचे देवराज यांनी सांगितले.