भिवंडीत सराईत गुन्हेगारांकडून दहा मोटरसायकली जप्त; शांतीनगर व भोईवाडा पोलिसांची कारवाई
By नितीन पंडित | Published: December 13, 2022 06:36 PM2022-12-13T18:36:34+5:302022-12-13T18:38:55+5:30
भिवंडीत सराईत गुन्हेगारांकडून दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
भिवंडी : भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना शांतीनगर व भोईवाडा पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत तब्बल दहा मोटारसायकली जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.शांतीनगर पोलीस ठाण्यातील सहा तर भोईवाडा पोलीस ठाण्यातील चार वाहन चोरीच्या घटनांचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले असून तब्बल ३ लाख ४० हजार रुपये किमतीचे वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके,किशोर खैरनार मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर पोलीस निरीक्षक एस एन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उप निरीक्षक दिनेश लोखंडे व पोलीस पथकातील पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे मालेगाव नाशिक येथून नफिज मोईनुद्दीन अन्सारी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या होंडा शाईन मोटर सायकलचा सुगावा लागल्यानंतर सदरची मोटर सायकल मालेगाव इथून पोलिसांनी हस्तगत केली.त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता शांतीनगर व भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतून त्याने दोन वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली यात एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या चार मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या.
तर शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या नेतृत्वाखालील साहाय्यक पो निरी शैलेश म्हात्रे व पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी गुप्त बातमीदारां मार्फत माहिती घेऊन जबिउल्ला इद्रिस अन्सारी ,संजयनगर यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून शांतीनगर पो ठाणे हद्दीतील तीन दुचाकी,दोन रिक्षा व भोईवाडा पो ठाणे हद्दीतील एक दुचाकी अशा सहा वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करीत १ लाख ८० हजार रुपयांची वाहन जप्त केली.शांतीनगर व भोईवाडा पोलीस ठाणे या मधील एकूण दहा वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल केल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे .