दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By admin | Published: May 29, 2017 06:16 AM2017-05-29T06:16:55+5:302017-05-29T06:16:55+5:30
ठाणे शहर आयुक्तालयातील ११ वरीष्ठ पोलीस निरीक्षकांसह १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर आयुक्तालयातील ११ वरीष्ठ पोलीस निरीक्षकांसह १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहेत. या बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. यात गुन्हे शाखेच्या सुलभा पाटील या महिला अधिकाऱ्याकडे आता श्रीनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे.
कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. जी. सूर्यवंशी हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे किशोर पासलकर यांची बाजारपेठ पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. अतिक्रमण विभागातील दत्तात्रय ढोले यांच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविली आहे. तर कासारवडवलीचे डी. डी. टेळे यांना आर्थिक गुन्हे शाखेत आणले आहे. प्रिझन एस्कॉर्टचे निळकंठ पाटील यांची कोळसेवाडीच्या वरीष्ठ निरीक्षकपदी तर कोळसेवाडीच्या कल्याणजी घेटे यांच्याकडे दहशतवाद विरोधी कक्षाची सूत्रे दिली आहेत. विशेष शाखेचे प्रदीप गिरीधर आता वर्तकनगरच्या वरीष्ठ निरीक्षक पदी येतील. तर वर्तकनगरचे के. जी. गावीत यांना प्रिझन एस्कॉर्टचा पदभार देण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या सुलभा पाटील यांच्याकडे श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी आहे.
मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकातून ठाणे आयुक्तालयात आलेले सुशिल जावळे यांच्यावर शीळ डायघरच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रवींद्र तायडे यांना मुदतवाढ
मुंब्रा पोलीस ठाण्याचे रविंद्र तायडे यांना एक वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे एम. एन. सातदिवे आणि राबोडीचे संभाजी जाधव यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आणण्यात आले.