शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी यंदा दहा हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा!
By सुरेश लोखंडे | Published: July 5, 2024 05:40 PM2024-07-05T17:40:31+5:302024-07-05T17:40:52+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीस अनुसरून जिल्ह्यासाठी ११ हजार ११० मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने राज्य शासनाकडे केली हाेती.
ठाणे : जिल्ह्यातील खरीप हंगाम यंदा ६० हजार हेक्टरवर घेतला जात आहे. त्यापैकी सर्वाधिक भाताच्या लागवडीसह वरी, नाचणी, गळीत व कडधान्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात घेता येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या तब्बल दहा हजार मेट्रीक टन रासायनिक खताच्या पुरवठ्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीस अनुसरून जिल्ह्यासाठी ११ हजार ११० मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने राज्य शासनाकडे केली हाेती. त्यास विचारात घेऊन शासनाने १० हजार मेट्रीक टन रासायनिक खताचा साठा मंजूर केला आहे. या आधी खरीप हंगामास अनुसरून जिल्ह्यात एक हजार ४५० मेट्रीक टन खताचा साठा कृषि सेवा केंद्रांकडे उपलब्ध होता. त्यासह आज अखेर जिल्ह्यात सहा हजार ४२८ मेट्रीक टन खताचा पुरवठा झालेला आहे. त्यामध्ये युरीया पाच हजार ८९३.२२ मेट्रीक टन, डीएपी खत ५३ मेट्रीक टन, पोटॅश खते २४ मेट्रीक टन, सुफर फॉस्फेट १८ मेट्रीक टन व संयुक्त व मिश्र खत ४४० मेट्रीक टन सध्या जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे.
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या या रासायनिक खतांची विक्री पॉस मशीनद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच करण्यात येत आहे. या खरीप हंगामात खतांची टंचाई जाणवू नये यासाठी ९१० मेट्रीक टन युरीया व २० मेट्रीक टन डीएपी खताचा संरक्षित साठा (बफर स्टाॅक) करण्यात आला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात रासायनिक खत पुरवठा संबधातील नियोजन सुरळीत सुरू आहे. रासायनिक खतांच्या बाबतीत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.