बालकांच्या २५ टक्के आरक्षणातील प्रवेशाच्या ठाणे जिल्ह्यात दहा हजार जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 05:49 PM2018-08-04T17:49:23+5:302018-08-04T17:55:52+5:30
दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले
ठाणे : मोठमोठ्या रकमेच्या देणग्या देऊन बालकांचे प्रवेश श्रीमंत पालकांकडून घेतले जातात. या महागड्या पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले. तिस-या फेरी अखेरच्या या प्रवेशानंतर देखील जिल्ह्याभरात अजून दहा हजार २५५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी दोन दिवसात चौथ्या फेरीव्दारे प्रवेश देण्याचे प्रयत्न आहेत.
प्लेगृप, फ्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केली आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश मिळत आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तिस-या फेरीव्दारे निवड केलेल्या ९३९ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत. संबंधीत शाळांमध्ये हे प्रवेश झाले आहेत. मात्र त्यांनी आॅनलाईन अपडेट अजून केले नाहीत. पण आगामी दोन दिवसात या प्रवेशांचे अपडेट व पुन्हा चौथ्या फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होईल, असा दावा शिक्षण विभागाव्दारे करण्यात आला.
आधीच्या दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिस-या फेरी अखेर ९३९ निवड केलेल्यापैकी प्लेगृपसाठी दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. तर प्रीकेजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थी, ज्यु.के.जी.साठी ३१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. याप्रमाणेच सीकेजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गा करीता ३८३ विद्यार्थ्यांना या तिस-या फेरीव्दारे दिल्याचे नियोजन आहेत. पाल्याचे प्रवेश वेळेत घेण्यासाठी पालकांना सतत सांगितले जात असल्याचे सांगितले जात आहेत. पण विविध कागदपत्रांसह अन्य तृटींच्या कारणाखाली संबंधीत बालकांच्या पाल्याना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या कमी दिसून येत आहेत.
** जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारात आहेत. तर काही विविध कागदपत्रे, आधारकार्ड आदींच्या त्रृटी काढून प्रवेश नाकारले जात आहेत. पालकांना चांगले वागणून न देता अपमानीत करण्याचा देखील प्रयत्न काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी पालकांच्या आहेत. शाळेतील साहित्य , गणवेश, स्कूल बस प्रवास आदीं शुल्कांबाबत देखील पालक व शाळांमध्ये शाब्दीक चकमकी होत असल्यामुळे प्रवेश रखडले जात आहेत. तर काहींकडे मोबाईल नसल्यामुळे निवड झाल्याचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्या देखील या आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.