अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास
By जितेंद्र कालेकर | Published: July 27, 2023 09:25 PM2023-07-27T21:25:34+5:302023-07-27T21:25:43+5:30
ठाणे न्यायालयाचा निकाल: कळवा पोलिसांनी केला तपास
ठाणे: कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागातून एका १५ वर्षीय मुलीला लग्नाच्या अमिषाने पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या अस्लम मोहम्मद अन्सारी (३०) या आरोपीला ठाणे न्यायालयाने सश्रम कारावासाचीआणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षेचेही आदेश न्यायालयाने दिले.
शाळेला सुटी असल्याने ही मुलगी भिवंडीतील काल्हेर भागात कामाला जात होती. त्याच दरम्यान तिची अस्लम याच्याबरोबर ओळख झाली. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला फूस लावून १३ जून २०१८ रोजी पळवून नेले. याच काळात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात अपहरणासह बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक झाली होती.
या खटल्याची सुनावणी २७ जुलै २०२३ रोजी ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश तसेच विशेष पोस्को न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांच्या न्यायालयात झाली. तपास अधिकाºयांसह नऊ साक्षीदारांची तपासणी यावेळी करण्यात आली. आरोपीला शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही बाजू पडताळल्यानंतर न्या. विरकर यांनी ही शिक्षा सुनावली.