अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस दहा वर्षांचा सश्रम कारावास
By जितेंद्र कालेकर | Published: November 30, 2023 08:22 PM2023-11-30T20:22:04+5:302023-11-30T20:22:19+5:30
ठाणे न्यायालयाचा निर्णय: भाईंदरमधील घटना
ठाणे: भाईंदर भागात एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या टेरी जोजफ भोनक्या (३८, रा. उत्तन, जि. ठाणे) याला दहा वर्षांच्या जन्मठेपेची तसच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश देशमुख यांनी गुरुवारी सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला तीन महिने साध्या कैदेचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भार्इंदर परिसरात राहणारी एक ३५ वर्षीय महिला ही तांदूळ सुकविण्यासाठी २० एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली होती. त्यावेळी तिची मुलगी घराबाहेर खेळत असतांना आरोपी टेरी याने तिच्या मुलीला घरातील बेडरुममध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात बलात्कारासह लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली त्याच दिवशी मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला सहायक पोलिस निरीक्षक प्रविणकुमार साळुंखे यांच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश देशमुख यांच्या न्यायालयात ३० नोव्हेंबर २०२३ रोजी झाली. सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यावेळी पिडित मुलीसह सात साक्षीदार तपासण्यात आले. पोलिस हवालदार दिलीप सनेर यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.