संगीत साधनेसाठी दहा वर्षांची शिष्यवृत्ती हवी
By admin | Published: January 11, 2016 01:52 AM2016-01-11T01:52:15+5:302016-01-11T01:52:15+5:30
संगीताच्या शिक्षणासाठी सरकारतर्फे दोन वर्षाची स्कॉलरशिप दिली जाते. गरीब मुलांना त्याचे अप्रूप वाटते. संगीताच्या शिक्षणासाठी दोन वर्षाचा कालावधी अपुरा असतो.
ठाणे : संगीताच्या शिक्षणासाठी सरकारतर्फे दोन वर्षाची स्कॉलरशिप दिली जाते. गरीब मुलांना त्याचे अप्रूप वाटते. संगीताच्या शिक्षणासाठी दोन वर्षाचा कालावधी अपुरा असतो. त्यासाठी दहा वर्षाची शिष्यवृत्ती असली पाहिजे. स्कॉलरशिप मध्ये मुलांना राग शिकवले जात नाही. अपू-या शिक्षणाने मुलांचे नुकसान होत असते. भारतात असलेली पाश्चिमात्य पद्धत जो पर्यंत जात नाही तो पर्यंत भारतातील कोणताही विषय पुढे जाऊ शकणार नाही असे परखड मत गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.
विश्वशांती संगीत समितीतर्फे शनिवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती संगीत नृत्य महोत्सवाच्या कार्यक्र मात किशोरीताईंशी संगीतशास्त्राचे अभ्यासक प्रा. केशव परांजपे व त्यांच्या शिष्या नंदिनी बेडेकर यांनी मुक्तसंवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, संगीत हे वैश्विक आहे. तपश्चर्या, जपापासून आपण कित्येक विषय अनुभवतो. परंतू कानाला गोड वाटतो तो सूर. सूर हा शरीराला आनंद देणारा आहे. नृत्यातून शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली होत असतात. त्यात धांगडधिंगा नसतो. त्यातून नृत्य करणा-याला शांती मिळत असते. नृत्य-सुरातून जो आनंद सादर करणा-याला मिळत असतो तो प्रेक्षकांनाही मिळत असतो. लोक वाईट असतात असे आपण म्हणत असतो तेव्हा आपण काहीतरी चुकत असतो. लोक अपेक्षेने येतात. त्यांच्या अपेक्षांची पूर्ती झाली पाहिजे. सुरांची भाषा झाडे-फुले, कीटक, जमीन यांनाही समजत असते. सूर शब्दांना गाते करतो. सूर एकमेकांच्या हातातहात घालून येत असतात. संगीत कलेमध्ये ज्ञानसंपादन करावे. ज्ञानाचा आनंद मिळत असतो. संगीतातील राग गाता आला पाहिजे. रागाचा विचार आयुष्याशी, जीवनाशी जुळतो. राग आई सारखा दयाळू आहे. आई मुलाला जशी संभाळते तसा राग सांभाळत असतो. रागाची साधना केली पाहिजे. जो पर्यंत आपले समाधान होत नाही, तो पर्यंत साधना केली पाहिजे. चांगल्या गाण्यासाठी श्रोते आहेत. ते खरे असले पाहिजे, फक्त श्रवण करणारे नको. चांगले गाणे असेल तर चार श्रोते बसू शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
या विषयाचा अभ्यास करणा-यांनी महिनाभर सा म्हटला पाहिजे. त्यानंतर सूर येतील. सूर आले कि माध्यमावर प्रभुत्व येईल. त्यातून माध्यमाच्या पलीकडे असलेली शांती मिळेल असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्र माच्या पुर्वार्धात पं.सुरेश बापट, कल्याणी साळुंखे, किशोर पांडे, संस्थेच्या प्रमुख मुक्ता जोशी आणि त्यांच्या विद्यार्थिनींचे कार्यक्र म झाले.