नव्या एक्स्टेंडेड रेल्वे स्थानकाच्या परिसराच्या कामाची पालिका काढणार निविदा, वेळ वाचविण्यासाठी पालिकेने केली आधीच तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:41 PM2018-04-16T16:41:27+5:302018-04-16T16:41:27+5:30
नव्या एक्स्टेंडेड ठाणे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या पसिराचे काम करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार येथे ११९ कोटींची कामे केली जाणार आहेत.
ठाणे - मनोरुग्णालच्या जागेवर होणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाच्या उभारण्यासाठी आरोग्य विभागाची अंतिम मंजुरी अद्यापही शिल्लक आहे. परंतु मागील सुमारे १० वर्षे या प्रकल्पाचे गुऱ्हाळ सुरु आहे. असे असले तरी येत्या काही दिवसात आरोग्य विभागाची देखील मान्यता मिळण्याची शक्यता असल्याने त्यानुसार ठाणे महापालिकेने येथील पसिरराचे काम करण्यासाठी नियोजन आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे पार्कीग, डक एरिया उभारणे, स्टेशनकडे जाणारा रस्ता तयार करणे आदी कामे करण्याचे नियोजन आखण्यात आले असून येत्या दोन दिवसात या कामाची ११९ कोटींची निविदा काढली जाणार आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी केंद्रिय रेल्वे मंत्रालय आणि नगर विकास मंत्रालयात नुकताच एक संयुक्त करार झाला असून त्यात ठाणे स्टेशनच्या विकासासाठी अमृत योजनेतून निधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानका दरम्यान प्रस्तावित असलेले एक्स्टेंडेड ठाणे स्टेशन ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एलिव्हेटेड स्वरूपात उभारण्याचा रेल्वे प्रशासनाचाच प्रस्ताव नुकताच मागे घेण्यात आला आहे. हे स्टेशन आता पुन्हा मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरच उभारण्यात येणार आहे. या स्टेशनसाठी जेवढा खर्च येईल त्यापैकी ५० टक्के वाटा उचलण्याची पालिकेची तयारी आहे. रेल्वे स्टेशन आणि त्या भोवतालचा परिसर विकास करण्यासाठी केंद्राच्या अमृत योजनेतून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्याचा फायदा एक्स्टेंडेड ठाण्याला होणार आहे.
मनोरूग्णालयाच्या जागेवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या विस्तारीत ठाणे रेल्वे स्टेशनसाठी जागा हस्तातंरणासाठी ठाणे महानगरपालिकेने आरोग्य विभागाला जागेच्या मोबदल्याचे तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार एकूण आरक्षित क्षेत्र ठाणे महापालिकेच्या ताब्यात दिल्यास त्या क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्र इतके विकास हक्क हस्तातंरण प्रमाणपत्र देय इन्सेटींव्हसह देणे. तसेच आरक्षित क्षेत्रामधील झोपड्यांच्या पुनर्वसन महापालिकेच्यावतीने करणे, आरक्षित भुखंडापैकी अतिक्रमीत भुखंड व सर्वसाधारणपणे रेल्वे हद्दीपासून ३० मीटर अतंरात बांधकाम करता येत नसल्याने ते क्षेत्र वगळून उर्वरीत अनुज्ञेय बांधकाम क्षेत्राएवढे क्षेत्रफळ आरोग्य विभागास बांधीव स्वरूपात ठाणे शहरामध्ये अन्यत्र बांधकाम करून हस्तांतरीत करणे आणि ठाणे महापालिका हद्दीत अन्य सोयीस्कर जागी नव्याने आरोग्य विभागासाठी १४.८३ एकर भुखंड आरक्षित करून ही जागा टीडीआर देवून खाजगी व्यक्तीकडून संपादित करून हस्तांतरित करणे आदी तीन पर्यायांचा समावेश आहे. यावर येत्या काही दिवसात निर्णय येणे अपेक्षित आहे. असे असले तरी देखील आता ठाणे महापालिकेने या स्थानकाच्या उभारण्यासाठी किंबहुना या स्थानकाचा परिसर विकास करण्यासाठी पावले उचली असून, त्यानुसार परिसराचा विकास करण्यासाठी ११९ कोटींची निविदा काढली आहे.
नव्या स्थानकात ११९ कोटीची कामे
नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या ११९ कोटींच्या आराखड्यास रेल्वे विभागाने काही महिन्यांपुर्वी मंजुरी दिली होती. या आराखड्यामध्ये नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तेथील प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल, पार्कींग व्यवस्था आणि विद्युत व्यवस्था अशा कामांचा समावेश होता. याच कामांसाठी निविदा काढण्यात येणार असून ही कामे स्मार्ट सिटीच्या अमृत योजनेच्या निधीतून केली जाणार आहेत.
चौकट -
जागा हस्तांतरणाबाबत आरोग्य विभागाने यापुर्वीच सकारात्मक भुमिका घेतली आहे. त्यामुळे या जागा हस्तांतरणाबाबत आरोग्य विभागाकडूनही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयानंतर स्थानक परिसरात प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी उशीर होऊ नये म्हणून ही आधीच करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात निविदा काढल्या जाणार आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाकडून जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
(सुनील चव्हाण - अतिरिक्त आयुक्त -ठामपा)