रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा लवकर काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:58+5:302021-06-09T04:49:58+5:30
कल्याण : रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाची निविदा लवकर काढावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ...
कल्याण : रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाची निविदा लवकर काढावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे केली आहे.
शिंदे यांनी श्रीनिवास यांची मंगळवारी भेट घेत ही मागणी केली. शिंदे यांनी नुकतीच रिंग रोडच्या दुर्गाडी ते टिटवाळादरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या टप्प्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या कामातील काही अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित ४० टक्के कामही मार्गी लागून हा टप्पा डिसेंबरअखेर पूर्णत्वास येणार आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या टप्प्याचे कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची ८० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली खाडीपुलाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी लवकरात लवकर निविदाप्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित करावा, अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली.
आठव्या टप्प्याचे नियोजन करावे
रिंग रोडचा सातवा टप्पा हा टिटवाळा येथे संपतो. हा रस्ता पुढे गोवेलीला जोडला जावा. हा रस्ता कल्याण-मुरबाड रोडला जोडण्यासाठी अतिरिक्त आठव्या टप्प्याचे नियोजन करावे. हा टप्पा केवळ दोन किलोमीटर अंतराचा आहे. एक नवी केनेक्टिव्हिटी तयार होऊन त्यांचा स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना फायदा होईल, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
-------------------