मुंब्य्राच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अखेर निविदा, ठेकेदार सक्षमीकरणावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:48 AM2017-08-24T03:48:27+5:302017-08-24T03:48:31+5:30
मुंब्य्रातील पाणीपुरवठ्याचे रिमॉडेलिंग करण्याचे निश्चित करून एका विशिष्ट ठेकेदारालाच हे काम देण्यासाठी पालिकेच्या काही मंडळींनी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते.
ठाणे : मुंब्य्रातील पाणीपुरवठ्याचे रिमॉडेलिंग करण्याचे निश्चित करून एका विशिष्ट ठेकेदारालाच हे काम देण्यासाठी पालिकेच्या काही मंडळींनी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने आता आपला हा हट्ट सोडून या कामासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे एका विशिष्ट ठेकेदाराला हे काम देण्याच्या काही अधिकाºयांच्या मनसुब्यांना खीळ बसली आहे.
मुंब्य्राची तहान भागवण्यासाठी येथील पाणीवितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी पालिकेने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. त्यानुसार, २०११ मध्ये तशा स्वरूपाचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला होता. २०१३ मध्ये या कामाला सुधारित मंजुरी मिळाल्यानंतर या कामासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून हे काम करण्याचे निश्चित केले होते. सेंट्रल पब्लिक हेल्थ एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग आॅर्गनायझेशने या तांत्रिक संस्थेने त्यात काही बदल सुचवून मंजुरीसुद्धा दिली होती. मात्र, केंद्रीय वित्त विभागाने नकारघंटा वाजवल्याने योजनेला निधी मिळू शकला नाही. परंतु, केंद्रातील सरकार बदलल्यानंतर पालिकेने अमृत योजनेतून हे काम करण्याचे निश्चित केले होते. परंतु, केंद्रानेदेखील नकार दिल्याने पालिकेने यासाठी स्वत: निधी उभारून काम करण्याचे निश्चित केले. तसा प्रस्तावही तयार केला. तो तयार करताना पुन्हा तीन वर्षांपूर्वीच्या ठेकेदाराला हे काम देण्याचे पालिकेने निश्चित केले.
वास्तविक यासंदर्भात स्पर्धात्मक निविदा काढणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता चार वर्षांनंतरही ही मुंब्य्रातील कामाची निविदा जिवंत ठेवण्याचे कसब पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने करून दाखवले होते. यासंदर्भात लोकमतमध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता स्पर्धात्मक निविदा काढली जाणार आहे.
- या प्रकरणाची स्वत: आयुक्तांनी दखल घेतली असून या कामासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया निघणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. परंतु, नव्याने निविदा प्रक्रिया करताना यात चार वर्षांचा अवधी गेल्याने निविदा काढल्यास कामाचा खर्च वाढू शकतो, अशी भीतीही आहे.