धूळखात पडलेल्या सव्वातीन कोटींच्या घंटागाड्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटींची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:24+5:302021-05-11T04:42:24+5:30
भिवंडी : भ्रष्टाचार व स्वच्छतेच्या अभावासह शहरात मूलभूत समस्या पुरविण्यास अपयश येत असल्याने सतत चर्चेत असलेल्या भिवंडी महापालिकेने सव्वातीन ...
भिवंडी : भ्रष्टाचार व स्वच्छतेच्या अभावासह शहरात मूलभूत समस्या पुरविण्यास अपयश येत असल्याने सतत चर्चेत असलेल्या भिवंडी महापालिकेने सव्वातीन कोटी खर्चून घेतलेल्या ५० घंटागाड्या गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून धूळखात ठेवल्यानंतर आता त्यांच्याच दुरुस्तीवर प्रशासनाने तब्बल एक कोटी सहा लाख वीस हजार रुपये किमतीची निविदा काढली आहे. विशेष म्हणजे या घंटागाड्या खरेदी करून एकही किलोमीटर शहरात धावल्या नसतानाही त्यांच्या निगा व दुरुस्तीसाठी एक कोटींची निविदा काढल्याने काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनावर टीका केली आहे.
या घंटागाड्या वापरात न आल्याने कोंबडपाडा येथील भांडारगृहात धूळखात पडल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये खर्च करून ५० घंटागाड्या धूळखात ठेवून खासगी ठेकेदारांवर मनपा प्रशासन कोटींची उधळण करीत आहे. नव्या या घंटागाड्यांवर चालक व इतर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्या जागीच उभ्या असल्याचा निर्वाळा भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दोन महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र, आता एकही किलोमीटर न धावलेल्या या नव्या घंटागाड्यांच्या निगा व दुरुस्तीसाठी प्रशासनाने तब्बल एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांची निविदा काढल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
५० घंटागाड्यांसाठी एकूण तीन निविदा मनपाने काढल्या असून एक निविदा वाहनचालक भरतीसाठीची असून सदर विषय स्थायी समितीकडे प्रलंबित आहे, दुसरी निविदा या गाड्यांमध्ये लावण्यात येणाऱ्या जीपीआरएस सिस्टीमसाठी आहे, तर तिसरी निविदा देखभाल दुरुस्तीसाठी असून त्या जेव्हा रस्त्यावर धावणार त्यावेळी जर त्यांना काही अपघात व दुरुस्ती करण्याची वेळ आली तर त्यासाठी पाच वर्षांसाठी ही निगा व देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. आता उभ्या असलेल्या घंटागाड्यांच्या दुरुस्तीसाठी ती काढली नाही, अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.