कोपरीतील बँक आॅफ बडोदा मधून दहा हजारांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:28 PM2021-11-10T16:28:43+5:302021-11-10T16:30:38+5:30
ठाण्यातील कोपरी आनंद सिनेमागृहाच्या मागे असलेल्या बँक आॅफ बडोदा या बँकेचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी पहाटे चोरटयांनी केला. तो अयशस्वी ठरला. मात्र, बँकेत व्यवस्थापकांनी ठेवलेली त्यांची वैयक्तिक दहा हजारांची रोकड मात्र चोरटयांनी लंपास केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील कोपरी आनंद सिनेमागृहाच्या मागे असलेल्या बँक आॅफ बडोदा या बँकेचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी पहाटे चोरटयांनी केला. तो अयशस्वी ठरला. मात्र, बँकेत व्यवस्थापकांनी ठेवलेली त्यांची वैयक्तिक दहा हजारांची रोकड मात्र चोरटयांनी लंपास केली. बँकेतील चोरीच्या या प्रयत्नामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता बँक बंद केल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बँक उघडली. त्यावेळी चोरीचा हा प्रकार समोर आला. बँकेच्या पश्चिमेकडील भिंतीला असलेल्या काचेच्या खिडकीबाहेरील सुरक्षेसाठी लावलेली लोखंडी ग्रील बळाचा वापर करुन तोडण्यात आली. स्लायडींगची काच उघडून चोरटयांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर बँकेच्या शाखा व्यवस्थापक अलका चाळके (५८, रा. कल्याण) यांच्या टेबलाच्या खणामध्ये वैयक्तिक वापरासाठी त्यांनी ठेवलेली दहा हजारांची रोकड लंपास करण्यात आली. मुख्य तिजोरीपर्यंत पोहचण्यापूर्वीच बँकेचा सुरक्षा सायरन वाजल्याने चोरटयांनी तिथून पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास पळ काढला. दरम्यान, याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात व्यवस्थापक चाळके यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे हे अधिक तपास करीत आहेत. बँक तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे यातील चोरटयांचा माग काढण्यात येत असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.