बकऱ्यावरून मीरा रोडमध्ये तणाव; कुटुंबास धक्काबुक्की काशिमीरा ठाण्यात ५२ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:41 AM2023-06-29T08:41:42+5:302023-06-29T08:43:18+5:30
Mira Road: मीरा रोडच्या जे. पी. नॉर्थ या गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त बकरा आणण्यावरून रहिवाशांनी एका विशिष्ट धर्माच्या कुटुंबास धक्काबुक्की केल्याचा आरोप त्या कुटुंबाने केला.
मीरा रोड : मीरा रोडच्या जे. पी. नॉर्थ या गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त बकरा आणण्यावरून रहिवाशांनी एका विशिष्ट धर्माच्या कुटुंबास धक्काबुक्की केल्याचा आरोप त्या कुटुंबाने केला. बुधवारी पहाटेपर्यंत संकुलाच्या आवारात धार्मिक घोषणा देत रहिवाशांनी बकऱ्याला ठेवण्यास विरोध केला. काशिमीरा पोलिस ठाण्यात ५२ रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
महामार्गालगत वेस्टर्न हॉटेलजवळ जे. पी. नॉर्थ हे मोठे गृहसंकुल आहे. सदर संकुलातील एस्टेला इमारतीत मोहसीन खान, त्यांची पत्नी व चार वर्षांचा मुलगा राहतात. गुरुवारी बकरी ईद असल्याने मंगळवारी रात्री खरेदी करून इमारतीत परतले असता रहिवाशांच्या जमावाने त्यांची गाडी अडवून गाडीत कुर्बानीसाठी बकरा आणलाय का म्हणून जबरदस्तीने तपासणी केली, असा त्यांचा आरोप आहे. तसेच घरात ठेवलेला बकरा काढून टाका, सोसायटीच्या परवानगीशिवाय बकरा कसा काय आणला, असे धमकावल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यातून दोन्ही बाजूने बोलाचाली होऊन वाद वाढला.
विनयभंग, दंगलीचे गुन्हे
मोहसीन यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे ओळख पटलेले काळ्या टी-शर्टमधील इसम, उदयचंद्र कामत, आशिष त्रिपाठी, लाल सिंग, चंद्रा सेन, अमित तिवारी, धर्मेंद्र सिंग, राम लखन सिंग, आनंद पटवारी, श्रीमंत शेखर तसेच अन्य ३० ते ४० जण अशा ५२ लोकांवर विनयभंग, दंगल आदी गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल केल्याबद्दल संताप व्यक्त करत लोक पोलिसठाण्यावर गेले.