पोलिसांकरवी वाघबीळ ग्रामस्थांवर दबाव; आव्हाडांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 02:21 AM2019-04-27T02:21:11+5:302019-04-27T02:21:27+5:30
रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
ठाणे : वाघबीळ गावातील रहिवाशांनी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना पिटाळून लावल्यानंतर त्याठिकाणी ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला असून सरकारने पोलिसांकरवी येथील रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
मंगळवारी वाघबीळ गावात विचारे यांची रॅली गेली होती. परंतु, रहिवाशांनी त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर, गुरुवारी कोपरीच्या रहिवाशांनीही त्यांना पिटाळल्याचा आरोप आव्हाडांनी केला. ही केवळ सुरुवात आहे. या मंडळींनी समाजकारण न करता केवळ राजकारण करून स्थानिकांचे नुकसान केले. त्यांच्या जमिनी हडप करून विकासकामे केली जात आहेत. त्याठिकाणी रोजगार निर्मिती होत असताना शिवसेना आपल्या घरच्यांना, मित्रांनाच ती कामे देत आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारी आणखी वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
हे केवळ जातीचे राजकारण नसून हा रहिवाशांनी केलेला उद्रेक असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारकडून दबाव आणून त्या गावात पोलीस बंदोबस्त लावल्याचा आरोप त्यांनी केला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिवसेना विसरली आहे. ती राजकारणातून केवळ व्यापार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.