केडीएमसीच्या १८ गावांतील नगरसेवकांवर मुदतीपूर्वीच गंडांतर? गावे वगळल्याने होणार कृती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:22 AM2020-07-11T02:22:48+5:302020-07-11T02:22:54+5:30

केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Term expires of KDMC corporators in 18 villages ahead of time? Excluding villages will lead to action | केडीएमसीच्या १८ गावांतील नगरसेवकांवर मुदतीपूर्वीच गंडांतर? गावे वगळल्याने होणार कृती

केडीएमसीच्या १८ गावांतील नगरसेवकांवर मुदतीपूर्वीच गंडांतर? गावे वगळल्याने होणार कृती

googlenewsNext

- प्रशांत माने
कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच आता या गावांतील १३ नगरसेवकांचे पदही मुदतीपूर्वीच बाद होणार आहे. जुलै २००२ ची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात असताना नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रक्रियेला केडीएमसीमधील निवडणूक विभागानेही सुरुवात केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, संबंधित विभागाने सध्या तरी याबाबत चुप्पी साधली आहे.

केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर, केडीएमसीत राहिलेल्या नऊ गावांसह महापालिकेच्या बदललेल्या हद्दीसह अधिसूचनाही सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आधीच दिले आहेत. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणूक विभागाने कामकाजाला सुरुवात केली आहे. महापालिकेतील नगरसेवकांचे सदस्यत्व ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. परंतु, कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबरनंतर काही महिने प्रशासकीय राजवट लागू होण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन होणार असल्याने या गावांमधील नगरसेवकांचे पद ११ नोव्हेंबरच्या मुदतीपूर्वीच बाद होणार आहे. १२ जुलै २००२ ला २७ गावे केडीएमसीतून वगळण्यात आली होती. त्यावेळी एमआयडीसीतील आजदे गावचे महसूल क्षेत्र पूर्णपणे महापालिकेतून वगळण्यात आले होते. तेव्हा प्रभाग क्रमांक ६६ चे एमआयडीसीचे तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांचे नगरसेवकपद बाद झाले होते.
महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, त्यांना दिलासा मिळाला नाही. हीच प्रक्रिया आता पुन्हा राबविली जाणार असल्याने १८ गावांतील नगरसेवकांचे पदही आता बाद होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत भाष्य करण्यास महापालिकेच्या निवडणूक विभागाने नकार दिला आहे.

या गावांमधील नगरसेवक होणार बाद
घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळिवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांमधील लोकप्रतिनिधींचे नगरसेवकपद मुदतीपूर्वीच बाद होणार आहेत.

Web Title: Term expires of KDMC corporators in 18 villages ahead of time? Excluding villages will lead to action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.