इमारतीवरील मोबाइल टाॅवरच्या यंत्रणेला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:50+5:302021-07-04T04:26:50+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ येथील शिवाजीनगर परिसरातील गणपती मंदिरासमोरील एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोबाइल टॉवरच्या यंत्रणेला आग लागली. या भीषण ...
अंबरनाथ : अंबरनाथ येथील शिवाजीनगर परिसरातील गणपती मंदिरासमोरील एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोबाइल टॉवरच्या यंत्रणेला आग लागली. या भीषण आगीत मोबाइल टॉवरची संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली. दुपारी १ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
अंबरनाथ शहरात अनेक इमारतींच्या छतांवर मोबाइल टॉवर उभारलेले आहेत. त्यातील एक मोबाइल टॉवर गणपती मंदिरासमोरील एका इमारतीवर उभारलेला आहे. या मोबाइल टॉवरची यंत्रणा इमारतीच्या छतावर आहे. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मोबाइल टॉवरच्या यंत्रणा कक्षातच आग लागली. या कक्षात मोबाइल टॉवरची संपूर्ण यंत्रसामग्री होती. अचानक आग लागल्यानंतर क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवावे लागले. अंबरनाथ नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोबाइल टॉवरची संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली होती. या आगीचा धोका इमारतीतील रहिवाशांना असल्याने संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. इमारतीच्या परिसरात असलेल्या घरांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. अर्धा तास ही आग धगधगत राहिली. अखेर, अग्निशामक दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. इमारतीच्या छतावर असलेल्या मोबाइल टॉवरच्या यंत्रणेला आग लागल्याने आता छतावरील मोबाइल टॉवरही सुरक्षित नसल्याची बाब उघड झाली आहे.