उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: July 17, 2024 06:38 PM2024-07-17T18:38:37+5:302024-07-17T18:39:12+5:30

झुंडीचा बंदोबस्त करा, नाहीतर नागरीक कायदा हातात घेतली... ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांचा पोलिसांना इशारा

Terror of armed mob in Ulhasnagar, case registered in Vitthalwadi police station | उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उल्हासनगर : हातात घातक शस्त्र घेऊन तरुणांच्या झुंडी कोणासाठी परिसरातून फिरतात, त्यांचा वेळीच बंदोबस्त करा. नाहीतर नागरिक कायदा हातात घेतली. असा इशारा ठाकरेसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना देताच, पोलिसांनी १५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करून काहीजणांना ताब्यात घेतले आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४, संतोषनगर परिसरातून १५ ते २० जणांचे टोळके हातात घातक शस्त्र घेऊन रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालते. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांना गेल्या आठवड्यात दिली. बोडारे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, शस्त्रधारी झुंडीचा प्रकार उघड झाला. त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून परिसरात झालेल्या प्रकारची माहिती दिली. तसेच परिसरातील याप्रकाराची माहिती पोलिसांना नाही का? यावर काय कारवाई केली? आदी प्रश्नांचा भडीमार त्यांनी पोलिसांना केला. तेंव्हा हा प्रकार पोलिसांना माहीत नसल्याचे उघड झाले. बोडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार व तपासाअंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी १५ पेक्षा जास्त जणांच्या झुंडीवर गुन्हा दाखल करून, काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ यांनी दिली आहे.

 शहरातील विविध चौक, जुन्या इमारती, रेल्वे स्टेशन परिसरात नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर रात्रीच्या वेळी धूमकुळ घालत असल्याचे चित्र आहे. असाच प्रकार संतोषनगर मध्ये गेल्या आठवड्यात घडला. बोडारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे झुंडीवर गुन्हा दाखल झाला. शहरातील विविध भागात अश्या झुंडीची दहशत निर्माण झाली. यापूर्वी खेमानी परिसरात अश्या झुंडीने धुमाकूळ घातला होता. तर उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन परिसर, स्कायवॉक आदी ठिकाणी अश्या झुंडीची दहशत आहे.

 स्कायवॉकवर खून
 उल्हासनगरच्या स्कायवॉकवर एका तरुणाने दारू पिण्यासाठी पैशे दिले नसल्याच्या रागातून टोळक्याने त्याच्यावर शस्त्राने वार करून खून केला होता. तसेच एका वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला होता. हे कमी म्हणून की काय? रेल्वे स्टेशनच्या बंद निवासस्थानी एका तरुणीवर बलात्काराचा प्रकार उघड झाला होता. लूटमार, हाणामारी, फसवणूक आदी गुन्ह्याचीही नोंद आहे.

 रिक्षाची तोडफोड
 उल्हासनगर रेल्वे स्टेशन मध्ये अश्याच टोळक्याकडून रिक्षांची तोडफोड करण्याचे प्रकार यापूर्वी झाले. रात्रीचे १० नंतर स्कायवॉक व स्टेशन परिसरातून नागरिक जाण्यास धजावत नाही. अशी दहशत झुंडीची आहे.
 

Web Title: Terror of armed mob in Ulhasnagar, case registered in Vitthalwadi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.