नाहक फिरणाऱ्यांची चाचणी; मार्केटमधील गर्दी ओसरली, आयकार्ड बघूनच रेल्वेचे तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:07 AM2021-04-24T00:07:46+5:302021-04-24T00:07:53+5:30
काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पातलीपाडा, वाघबीळनाका, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितिन कंपनी, तिनहातनाका, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा असून दुकानांच्या वेळाही बदलल्या आहेत. त्यानुसार ठाण्यात कडक अंमलबजावणी केली जात असली तरी ठाणे परिवहनच्या बसमधून सर्वांनाच प्रवासाची मुभा दिल्याचे चित्र दिसत होते. ठाण्यातील मुख्य मार्केटमध्ये रोजच्या सारखी गर्दी नसली तरी नागरिक थोड्या बहुत प्रमाणात खरेदीसाठी दिसत होते. पोलीस ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून तपासणी करीत होते. विशेष म्हणजे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची ॲंटीजेन चाचणी जांभळी नाक्यावरील मार्केटमध्ये केली जात होती.
काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पातलीपाडा, वाघबीळनाका, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितिन कंपनी, तिनहातनाका, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात होती. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणाऱ्या गाड्यांना परवानगी दिली जात होती. मात्र, ठाणे परिवहनच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे आयकार्ड तपासले जात नव्हते. उलट आम्हाला पालिका प्रशासनाकडून कोणतेच निर्देश नसल्याचे परिवहनचे कर्मचारी सांगत होते. त्यामुळे आम्ही बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थांबवत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाण्यात रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा भासत असून दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरात एवढी विदारक स्थिती असताना देखील नागरिक आणि प्रशासन मात्र बेफिकीरपणे वागत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.
सामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन, मेट्रोचा प्रवास प्रतिबंधित केल्याने चाकरमानी बससेवेकडे वळले खरे. परंतु. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटिस येथे दिसले.
सूचना देण्यासाठी भाेंग्याचा वापर
ठाण्यातील जांभळीनाका भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी गर्दी होती. परंतु, प्रमाण मात्र थोडे कमी होते. सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने नागरिक त्याठिकाणी खरेदीसाठी जात होते. गुरुवारपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे यासाठी पोलिसांनी भोंग्यावर लोकांना सूचना देण्याची सुरुवात केली आहे. तर विनाकरण जे फिरतात त्यांच्यावर कारवाई तर पोलीस करतच आहेत, परंतु आता अशा लोकांची ॲंटीजेन टेस्ट पोलिसांनी सुरु केली आहे. जे विनाकारण फिरताना दिसत होते, त्यांना थेट ॲंटीजेन टेस्टच्या रांगेत उभे करुन त्यांची चाचणी केली जात होती.
स्थानकात प्रवाशांसाठी वेगळी मार्गिका
शुक्रवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानकात लॉकडाऊनचे परिणाम दिसून आले. रेल्वे पोलीस भोंग्यावर प्रवाशी वर्गाला सूचना देत होते. विनाकारण प्रवास करू नका नाहीतर कारवाई होईल, असे आवाहनदेखील पोलीस यावेळी करत होते. स्थानकात प्रवाशांसाठी वेगळी मार्गिका तयार केली आहे. तिकीट खिडकीवर प्रवाशांचे आयकार्ड चेक करून मगच त्यांना तिकीट दिले जात होते.
वर्दळ झाली कमी
शुक्रवारी रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे दिसत होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच मुभा दिली जात होती. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोलनाका याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात होती.
बेजबाबदार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पोलीस व पालिकेने आता नाक्यानाक्यावर चाचणी सुरू केली आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे बेजबाबदार नागरिक, व्यावसायिक मोकाट फिरत आहेत. त्यातच अनेक नागरिक, फेरीवाले व व्यावसायिक मास्क घालत नाहीत किंवा मास्क अर्धवट घालतात. पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यातच या नागरिकांना पोलीस नाक्यांवर सुरू केलेल्या पालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रात नेऊन त्यांची कोरोना चाचणी करायला लावत आहेत. अहवाल पॉझिटिव्ह येताच त्या व्यक्तीला थेट अलगीकरण किंवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे बेशिस्त व बेजबाबदार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.