आदित्य ठाकरे यांच्या होळी मिलनाकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:22 AM2019-03-22T06:22:41+5:302019-03-22T06:22:59+5:30
भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले.
मीरा रोड - भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले. होळी मिलनच्या माध्यमातून उत्तर भारतीयांशी राजकीय मनोमिलन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला; परंतु बहुतांश खुर्च्या रिकाम्याच असल्याने उत्तर भारतीयांनी पाठ फिरवल्याचे दिसत होते.
प्रताप फाउंडेशनच्या वतीने शिवार उद्यान येथे उत्तर भारतीयांचा होळी मिलन समारोह कार्यक्रम शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम प्रतापसिंह व युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी आयोजित केला होता.
होळी मिलनच्या माध्यमातून उत्तर भारतीयांशी मनोमिलन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला; पण उत्तर भारतीयांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. व्यासपीठासमोर दोन भागांत मांडलेल्या खुर्च्यांपैकी एका भागातील सर्व खुर्च्या, तर दुसऱ्या भागातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याने त्या काढून घेण्यात आल्या.
महाराष्ट्रात माझ्यापेक्षा जास्त वर्षांपासून उत्तर भारतीय राहतात. माझ्यापेक्षा ते चांगली व स्पष्ट मराठी बोलतात. तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचे आहोत, वेगळे नाहीत. चांगल्या, वाईट प्रसंगी आपण एकत्र येतो. आपण एकमेकांना आपले मानतो. भाषा महत्त्वाची नाही. दिल की बात येथे होते, म्हणून आलो, असे ठाकरे म्हणाले.
आपल्या रक्ताचा, शरीराचा जो भगवा रंग आहे, तो उतरू देऊ नका. देशाचा पंतप्रधान काशीमधून येतो, म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात नाही, तर सोबत उभे आहोत, असे ते म्हणाले. ठाकरेंसह सेनेचे उमेदवार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आदी उपस्थित होते.
‘सर्व आपलेच आहेत’
ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात जय श्रीरामने केली. काही पत्रकारांनी विचारले, उत्तर भारतीयांच्या मंचावर तुम्ही काय बोलणार? कोणत्या भाषेत बोलणार? त्यावर, माझ्यासाठी सर्व हिंदुस्थानी आहेत व सर्व आपले आहेत, असे ठाकरे म्हणाले.