एसआरएकडे पाठ

By admin | Published: July 7, 2017 06:26 AM2017-07-07T06:26:48+5:302017-07-07T06:26:48+5:30

झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी

Text to SRA | एसआरएकडे पाठ

एसआरएकडे पाठ

Next

अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी येथील झोपडपट्टी पुनर्विकासाकरिता विकासक तयार होत नसल्याने अनेक फायली प्रलंबित आहेत. केवळ एसआरएच्याच नाही तर यापूर्वी शहरात सुरु असलेल्या एसआरडी योजनेच्या फाईलदेखील विकासकांच्या थंड्या प्रतिसादामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ वाटाघाटी आणि पुनर्विकासाची योग्य हमी मिळत नसल्याने या कामांना अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
घोडबंदर येथील ठाणे महापालिकेच्या भाजी मंईडच्या दुसऱ्या मजल्यावर एसआरएचे कार्यालय सुरु झाले. पूर्वी एसआरए मंजुरीसाठी मुंबईला जावे लागत होते. त्यात सहा ते सात महिन्यांचा कालावधी जात होता. ठाण्यात हे कार्यालय सुरु झाल्यावर योजनांना एक ते दोन महिन्यांत मंजुरी मिळू शकेल, असा विश्वास एसआरएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे काही झालेले नाही. पूर्वी ठाण्यात एसआरडीअंतर्गत कामे केली जात होती. त्याअंतर्गत आतापर्यंत पाच योजना मार्गी लागल्या त्यांना ओसीदेखील देण्यात आली आहे. तब्बल ५२३ झोपडीधारकांना या योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे. आणखी ४ नव्या योजनांची कामे सुरु असून २२५ चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. एसआरडी बंद झाल्यानंतर एसआरए अंतर्गत काही योजना बदलण्यात आल्या असून त्यामध्ये २६ प्रकल्पांची कामे सुरु असून यामध्ये ७ हजार ७१५ झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे. मात्र, मागील कित्येक वर्षापासून ८ योजनांमध्ये अद्यापही कोणतीही प्रगती झालेली नाही. यामध्ये ४ हजार ५३४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. परंतु, हे झोपडीधारक आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झोपडपट्टीवासीयांमध्ये एकी नसणे हे योजना रखडण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच वाटाघाटी योग्य प्रकारे न होणे, योजना मंजुरीच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणे यासह इतर कारणांमुळे या प्रकरणांमध्ये प्रगती नाही.

ओसीच्या प्रतीक्षेत २४ योजना अडकल्या

एसआरएच्या योजनेत पात्र झालेल्या प्रस्तावांची संख्या १५ असून यामध्ये २८३३ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर मागील तीन महिन्यांत नव्याने दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या ही १० च्या आसपास आहे. यामध्ये २०३९ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यामध्ये नामदेवाडीचे दोन, वाकरवाडी, चिखलवाडी, फुलेनगर, पाचपाखाडी, पारशीवाडी, नागसेनगर, वर्तकनगर आणि शिवाईनगर या १० योजनांचा समावेश आहे.

पूर्वी एसआरडी योजनेत ओसी मिळवायची झाली तर त्याचा खर्च कोट्यवधीच्या घरात जात होता. त्यामुळे विकासकांनी इमारती तर बांधल्या. परंतु, ओसीच्या प्रतीक्षेत आजही २४ योजना अडकल्या आहेत. यामध्ये २ हजार ७६५ झोपडीधारकांचे वास्तव्य आहे. परंतु, ही योजना बंद झाली आणि एसआरएअंतर्गत ओसीसाठी विशेष अभय योजना सुरु करण्यात आली. यामध्ये ओसीचा खर्च हा पहिल्या खर्चाच्या केवळ १० टक्केच होता.

त्याचा लाभ आता सुमारे १२ योजनांनी घेतला आहे. या योजनांमधील रहिवाशांनी हा खर्च केला आहे. प्रत्यक्षात हा खर्च विकासकाने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता संबधींत विकासकांना नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, तरीदेखील त्यांनी हा खर्च केला नाही तर त्यांच्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा एसआरए योजनेचे अधिकारी नितीन पवार यांनी दिला.

Web Title: Text to SRA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.