दीड लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:56 AM2018-06-05T03:56:57+5:302018-06-05T03:56:57+5:30
ठाणे जिल्ह्यातील शासन अनुदानित जिल्हा परिषदेच्या शाळांसह आश्रमशाळा, शासकीय अनुदानित आणि नगरपालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हाती यंदा वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शासन अनुदानित जिल्हा परिषदेच्या शाळांसह आश्रमशाळा, शासकीय अनुदानित आणि नगरपालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हाती यंदा वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. यामुळे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके असतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तो कितपत खरा ठरणार, हे शाळेच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३१ शाळा, आश्रमशाळा २४, शासकीय अनुदानित २९२, नगरपालिकेच्या ३६ शाळांमधून आजघडीला एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांसाठी सुमारे आठ लाख ९७ हजार २३२ पुस्तकांची मागणी नोंदवण्यात आली आहे. ती युडायस २०१७ च्या नुसार नोंदवण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. यापैकी सात लाख ४४ हजार २९५ पुस्तके तालुकास्तरावर वितरितदेखील करण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वीच ती तालुकास्तरावर वितरित करण्यात आली आहेत.