लाकडी नांगराकडे शेतकऱ्यांनी फिरविली आहे पाठ ?
By Admin | Published: June 23, 2017 05:07 AM2017-06-23T05:07:13+5:302017-06-23T05:07:13+5:30
पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळयांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज
लोकमत न्यूज नेटवर्क
कासा: पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळयांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज, पण सोबतच नांगर ओढणारी, चिखल तुडविणारी बैलांची जोडी, पण आजच्या आधुनिक युगात मात्र ही बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी पॉवर टिलर वापराकडे वळतांना दिसत आहेत.
खेडयापाडयातील शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोडया, बैलगाडी ही असणारच असा समज एकदा जून महिना उजाडला कि शेतकरी जमिन मशागतीसाठी नांगर दुरूस्ती करणे, नविन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नविन बैल खरेदी करणे किंवा भाडयाने आणणे. नांगरासाठी व चिखलणीसाठी लागणाऱ्या फाळासाठी मजबूत लाकूड शोधणे नांगरास दुसर शोधणे अशा कामांची शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. नांगर मजबूत टिकावू असावा यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर या सारख्या वनस्पतींच्या लाकडांचा वापर करतात.
मात्र आता ग्रामीण भागातील शेतकरी मशागतीच्या कामसाठी पॉवर टिलर वापरू लागला आहे. लाकडी नागंराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकऱ्यांना वेळ, पैसा तसचे शरीरीक श्रमदेखील वाचतात. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जाते. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामासाठी एकमेकांच्या शेतात जावून मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमित पणामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतात. तसेच पॉवर टिलर भाडयाने घेण्यास शेतकऱ्याला साधारणपणे ४०० रू. प्रती तास पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत.
पॉवर टिलरच्या पावरामुळे बैलगाडया आणि लाकडी नांगराच्या तुलनेत शेतकऱ्यांना आता जास्त खर्च होतो. परंतु कामे वेळेत होतात. असे शेतकरी महेंद्र पावडे म्हणतात. सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ५० हजारवर पोहचली आहे. तसेच भाडे तत्वावर बैलजोडयाही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे वर्षभर बैलांची राखण करणे. त्यांना खाद्य पुरविणे आदी बाबी शेतकऱ्यांना कराव्या लागतात. त्यामानाने उन्हाळयात गवत, पावसाळी वाहतूक, शेतातील धान्य वाहतूकीसाठी बैलगाडीची भाडेतत्वावर होणारी मागणीही आता खूपच कमी झाली आहे. तसेच पॉवर टिलर व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाच्या कृषी विभागाकडून दिले जाते. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामांसाठी लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलकउे वळतांना दिसत आहेत.