ठाण्यात सुरू असलेल्या अ. भा. मराठी व्यंगचित्रकार संमेलनात लहान मुलांची रंगली व्यंगचित्र कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:34 PM2018-01-21T12:34:23+5:302018-01-21T12:37:58+5:30
रविवारी सकाळी लहान मुलांची व्यंगचित्र कार्यशाळा कचराळी तलाव येथे आयोजित करण्यात आली होती. उत्साहाने, आनंदाने ही मुले या कार्यशाळेत सहभागी झाली होती. सोबत त्यांचे पालकही उपस्थित होते.
ठाणे : ठाण्यात सुरू असलेल्या कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनात रविवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची व्यंगचित्र कार्यशाळा पार पडली. यात विविध वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
ज्ञानराज सभागृह आणि कचराळी तलाव येथे संमेलना अंतर्गत कार्यक्रम आयोजित केले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रथमच महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात महिला व्यंगचित्रकार राधा गावडे आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी मार्गदर्शन केले तर दुसºया बाजूला लहान मुलांची व्यंगचित्र कार्यशाळा पार पडली. यात अमोल ठाकूर व गौैरव यादव यांनी प्रात्यक्षिके दाखविली. संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवातच शालेय विद्यार्थ्यांच्या व्यंगचित्र कार्यशाळेने झाली. यात मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. वही आणि स्केचपेन हे आयोजकांकडून पुरविण्यात आले होते. पाचपाखाडी येथील कचराळी तलाव येथे ही कार्यशाळा पार पडली. यात गणेश जोशी, वैजनाथ दुलंगे, विवेक प्रभुकेळुस्कर, विवेक मेहेत्रे, नागराज गरड यांनी मार्गदर्शन केले. पक्षी प्राणी, हसरे - रडके चेहरे, १५ दिवसाच्या बाळापासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे चेहरे, इमारती अशा अनेक गोष्टी मुलांना व्यंगचित्राच्या माध्यमातून शिकविण्यात आल्या. हसत खेळत, गमती जमतीत मुलांचा रविवारच्या सकाळी व्यंगचित्राचा तास रंगला होता. कार्यशाळा आवडल्याचे मुले आवर्जुन आपल्या पालकांना सांगत होते. आज दुपारी १.३० वाजता सर्व वयोगटातील व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर आमच्यासारखे आम्हीच स्पर्धा, अध्यक्षीय भाषण, जीवनगौरव पुरस्कार, परिसंवाद असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे. सायं. ७ वा. मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे हे या संमेलनात उपस्थित राहणार आहेत.