ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:27 AM2017-07-30T01:27:16+5:302017-07-30T01:27:19+5:30
सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वसईतील आशिष अनुप बनरवाल (२२) याने शनिवारी पहाटे अडीच
ठाणे : सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वसईतील आशिष अनुप बनरवाल (२२) याने शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कारागृहातील शौचालयात टी-शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी कारागृह प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने चौकशी सुरू केली आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला बीअर पाजून तिच्यावर गाडीत ६ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्या आरोपाखाली आशिषसह सहा जणांना १३ जुलै २०१६ रोजी अटक झाल्यानंतर १९ जुलै २०१६ पासून तो ठाणे कारागृहात आहे. गेले वर्षभर न्यायालयीन कोठडीत असलेला आशिष शुक्र वारी रात्री दूरदर्शनवरील चित्रपट पाहून १२ वाजता झोपण्यासाठी गेला. शनिवारी पहाटे आशिष कारागृहातील सर्कल क्रमांक-२ (नवीन जेल) येथील बराक क्रमांक-७ च्या शौचालयात गेला होता. त्याने खिडकीच्या गजास टी-शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य एक कैदी शौचालयात गेल्यावर ही बाब उघडकीस आली.
कारागृहातील वैद्यकीय अधिकाºयांनी आशिषला मृत घोषित केले. ठाणेनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी
दिली.
सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस नाहीत
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील आत्महत्येची ही दुसरी घटना असून यापूर्वी ज्या कैद्याने आत्महत्या केली होती, त्याच्यावरही बलात्काराचा आरोप होता. ठाणे मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ११०० कैद्यांची असून सध्या तेथे ३२०० कैदी आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी १९७ पोलीस कर्मचारी आहेत. त्यातील फक्त ७५ ते १०० कर्मचारी कैद्यांच्या देखरेखीसाठी आहेत. ६ कैद्यांमागे १ शिपाई हा नियम आहे. मात्र, ठाण्यात कैदी व पोलीस यांचे प्रमाण व्यस्त आहे.