ठाण्यातील कुख्यात गुंड गण्या जाधव जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 10:27 PM2017-07-30T22:27:21+5:302017-07-30T22:27:27+5:30
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’ मधील एक मुख्य आरोपी गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली
ठाणे, दि. 30 - लोकमान्यनगर भागातील कुख्यात गुंड तथा वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’ मधील एक मुख्य आरोपी गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी उकळणे, अपहरण, दरोडा आणि मारहाण करणे असे २३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे गण्याविरुद्ध दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वर्तकनगर पोलीस त्याच्या मागावर होते. अनेक गुन्हे त्याच्याविरुद्ध असल्यामुळे त्याची लोकमान्यनगर भागात दहशत होती. त्यामुळेच पोलिसांच्या अभिलेखावरील ‘टॉप-२०’ गुन्हेगारांच्या यादीत त्याचा समावेश होता. त्याच्यावर यापूर्वीही महाराष्टÑ विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई झाली होती. तरीही या भागात त्याच्याकडून गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. ७ जून २०१७ रोजी लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथील रहिवाशी सनी राय (२६) या रिक्षाचालकाचा दीपक बोरसे या गण्याच्या साथीदाराबरोबर वाद झाला होता. दीपकने एका महिलेची छेड काढल्यामुळे त्याला सनीने अटकाव केल्याने हा वाद उद्भवला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी दीपकने गण्या तसेच अन्य एका साथीदाराच्या मदतीने चाकूच्या धाकावर सनीचे अपहरण केले होते. त्याला मामा भाच्चे डोंगरावर नेऊन जबर मारहाण करून त्याच्याकडून दीड हजारांची रोकडही हिसकावली होती. याच प्रकरणात दीपक आणि विजय यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, यातील मुख्य आरोपी गणेश जाधव हा लोकमान्यनगर भागातील मामा भाच्चे डोंगरावर येणार असल्याची टीप पोलीस नाईक हेमंत मोरे यांना त्यांच्या खबºयाकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, हवालदार भूषण गावंड, माणिक आहेर आणि मोरे आदींच्या पथकाने त्याला सापळा रचून सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून रिक्षावाल्याकडून हिसकावलेली खंडणीतील दीड हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. त्याला ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.